fire incident in Akola अकोला शहरातील मुजफ्फरनगर परिसरात एका घरात गॅस गळतीमुळे भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिकांनी मिळून प्रयत्न केले. मुजफ्फरनगर संकुल क्रमांक ७ मधील इरफान कुरेशी यांच्या घरात गॅस गळतीमुळे सकाळी साधारण ७ वाजता अचानक आग लागली.
आग लागल्याची बातमी मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु आग लागलेली जागा अरुंद असल्याने अग्निशमन गाडी तेथे पोहोचू शकली नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी महापालिकेचे पूर्व विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली.
साजिद पठाण यांनी आपल्या घरातून आग प्रतिबंधक उपकरणे आणून स्थानिकांना दिली. त्यानंतर बोअरिंगचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, स्वयंपाकघरात असलेली एक महिला थोडक्यात बचावली गेली. तिला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अखेर अग्निशमन दलाच्या पाईपद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या कामात स्थानिक तरुण, नगरसेवक आणि साजिद पठाण यांच्यासह इतरांनीही मदत केली. सद्य:स्थितीत घरातील गॅस गळती थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.