अकोला न्युज नेटवर्क दिनांक १३ मार्च २०२४ :- सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने खासदार संजय धोत्रे यांच्या पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे. बोलण्यात, वागण्यात आणि जनसंपर्कात वडिलांचा ठसा असलेले अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपच्या वतीने ठीक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.
अनुप धोत्रे यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. ते २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यापासून भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रभारी आहेत. त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघस्तरीय महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन केले आहे. या शिबिरातून जवळपास ३५ हजार रुग्णांची नोंदणी आणि तपासणी करण्यात आली होती.
२०१४ आणि २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी बूथ, नगर आणि वार्डस्तरांवर बैठका घेऊन पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे. मुख्यमंत्री चषकाचे आयोजन करून त्यात मोठ्या प्रमाणात युवकांना सहभागी करून घेतले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया वॉररूमच्या माध्यमातून मतदान संपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
अनुप धोत्रे हे प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी (विशेषतः कापूस उत्पादक) म्हणून ओळखले जातात. अकोला येथील कृषी विज्ञान केंद्राचे सचिव म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ग्वाल्हेर येथील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते सचिव आहेत आणि त्या माध्यमातूनही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ते अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आणि अकोला येथील नीळकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक आहेत.
अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीमुळे भाजपला निश्चितच फायदा होईल आणि ते सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा मतदारसंघ जिंकू शकतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.