अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो, प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे दि.5 ऑक्टोबर 2024 पातूर : पातूर परिसरात सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थान (टेकडी) येथे दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. बोर्डी नदी किनारी असलेल्या एका टेकडीवर हे मंदिर वसले असून, अतिशय नयनरम्य वातावरण आहे. मंगळवार असो वा नवरात्र हा परिसर ‘भक्तांच्या गर्दीने गजबजून जात आहे. मातेच्या गडावर जाण्यासाठी सिमेंटच्या २४० पायऱ्या असून, पायऱ्याच्या बाजूला म्हाताऱ्या माणसांना आधारासाठी लोखंडी रेलिंग लावले आहे. पायऱ्या चढतानाच मंदिराचे व्यवस्थापक स्व. दीनानाथ महाराज यांची समाधी, हनुमान मंदिर, गणपती मंदिर लागते मातेच्या सभामंडपात पाय ठेवताच मनाला एक प्रकारची शांती मिळते.
मंदिर परिसरात असलेली स्वच्छता, शांतता व प्रसन्न मन एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव करते. नितांत श्रद्धेने आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी भक्त आपल्या आईला साकडे घालतो. सकाळच्या आरतीला पहिल्यांदाच आलेल्या भक्ताला एवढी गर्दी बघून सुखद धक्का बसतो. संस्थानने देणगीदार व भक्तांच्या मदतीने अनेक सुधारणा केल्या आहेत. लहान मुलांसाठी पाळणे, पिण्याच्या पाण्याची सोय,प्रसाधनगृह, बसण्याची सुविधा झाल्यामुळे लोक इतरवेळीसुद्धा सहलीला या ठिकाणी येतात.शाळांच्या मुलांच्या ट्रीपही येथे येतात. टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीवरून दृष्टिक्षेप टाकल्यास उत्तरेकडे नानासाहेबांचे पुरातन मंदिर आहे, तर दक्षिणेकडे शाहबाबूचा दर्गा आहे. गडाच्या पायथ्याशी तपे हनुमान मंदिर आहे. तेथेच गायत्री मंदिरही आहे. प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत सोयीच्या ठिकाणी असलेल्या या गडावर आपण एकदा आल्यास आपणास वारंवार यावे वाटेल.
पातूरची रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरुप
येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरूप मानलं जातं. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह विदर्भातील भक्तांसाठी पातुर म्हणजे जणू ‘प्रती माहूर’च आहे. याठिकाणी नवरात्रासोबतच वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. विशेष म्हणजे देवीच्या 108 शक्तीपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या चिंचोली रुद्रायनी येथील रुद्रयनी देवीचं मंदिर आणि डोंगर येथून दृष्टीक्षेपात पडतं.
या ठिकाणी आज दिसत असलेले मंदिर पहिल्यांदा पन्नास वर्षांपूर्वी दिसले. या ठिकाणी आज असलेली मूर्ती आधीच विराजमान होती. मात्र माळरान आणि जंगलाचा भाग असल्याने या ठिकाणी कुणीही येत नव्हतं. त्यातच ही टेकडी अत्तरकर यांच्या मालकीच्या शेतीचा भाग होती. या ठिकाणी आज असलेली मूर्ती एका हिवराच्या झाडाखाली विराजमान होती. त्यानंतर तात्यासाहेब अत्तरकर यांच्या कल्पकतेतून या मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ झाला.
या ठिकाणी श्रीकृष्ण, राम-सीता-लक्ष्मण आणि दत्तात्रयाच्या तीन मंदिरांचं बांधकामही पूर्ण झालं आहे. गेल्या काही वर्षांत भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मंदिराला आधी पायऱ्या नव्हत्या. त्यानंतर दगडांच्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. आता या मंदिराला 256 पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. संपूर्ण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले असून या ठिकाणी सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत.
मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था, भक्तनिवास यासोबतच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराजवळून बोर्डी नदी वाहते. निसर्गरम्य परिसर असलेल्या या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. तर नवरात्रातील नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.
- नवसाला पावणारी आई भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी धावून येते, असा भक्तांचा अनुभव आहे. ‘माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची सावली’ या ओळी गुणगुणत असलेला भक्त दर्शन झाल्यावर स्वतःला धन्य समजतो व गडावर पुन्हा येण्याचा संकल्प करून परततो.
- नवरात्रात देवीची आरती सकाळी ६.३० वाजता व संध्याकाळी ६ वाजता होते.
सकाळच्या आरतीला हजारावर भक्त हजर असतात. - गडावर कृष्ण, दत्त, रामाचे, अनुसया मातेचे व महादेवाचे मंदिर आहे.
- अकोला, वाडेगाव, बाळापूर, मालेगाव, बार्शीटाकळी आदी परिसरातून लोक सकाळीच आरतीला येतात.