Akola Crime News प्रभागातील विकास कामांच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासाेबत अरेरावी करणे महापालिकेतील एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले. माजी नगरसेवक असलेल्या या पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता विकास कामांना प्रारंभ करणाऱ्या कंत्राटदाराला बदडल्याची घटना गुरुवारी प्रभाग क्रमांक १८ मध्ये घडली.
अकाेला – प्रभागातील विकास कामांच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासाेबत अरेरावी करणे महापालिकेतील एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले. माजी नगरसेवक असलेल्या या पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता विकास कामांना प्रारंभ करणाऱ्या कंत्राटदाराला बदडल्याची घटना गुरुवारी प्रभाग क्रमांक १८ मध्ये घडली. संबंधित कंत्राटदार हा नेहमीच वादग्रस्त भूमिका घेत असल्याची चर्चा यानिमीत्ताने मनपाच्या वर्तुळात रंगली हाेती.
शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी राज्य शासनाकडून काेट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त हाेत आहे. सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना,नागरी दलित वस्ती सुधार याेजनेसह दलितेतर याेजनेतून शहरात विविध विकास कामे निकाली काढली जात आहेत. काही महिन्यांपूर्वी सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजनेतून प्रभाग क्रमांक १८ मध्ये रस्ते, नाल्या, धापे, पेव्हर ब्लाॅक आदी कामांची निविदा प्रसिध्द करण्यात आली हाेती. संबंधित कंत्राटदाराने शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या प्रभाग क्रमांक १८ मधील काही विकास कामांच्या निविदा जाणीवपूर्वक कमी दराने सादर केल्या. त्यामुळे निविदेत स्पर्धा हाेऊन इतर कंत्राटदार आपसूकच बाजूला सारल्या गेले. यासर्व बाबींचा परिपाक विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर समाेर आला. याच मुद्यावरुन शुक्रवारी सायंकाळी कंत्राटदाराला बदडण्यात आल्याची माहिती आहे.
कमी दराच्या निविदा; कामात खाेळंबा
महापालिकेत प्रशासकराज आल्यापासून काही कंत्राटदार जाणीवपूर्वक कमी दराने निविदा अर्ज सादर करुन विकास कामात खाेळंबा निर्माण करीत असल्याची बाब समाेर आली आहे. यामुळे दर्जेदार बांधकाम करणारे कंत्राटदार आपसूकच निविदा स्पर्धेत बाद हाेऊन बाजूला सारल्या जात आहेत. विकास कामांना सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच ही कामे निकृष्ट दर्जाची ठरत आहेत. असाच प्रकार प्रभाग क्रमांक ९ मध्ये नाली व रस्त्याच्या बांधकामात उघडकीस आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेने हा प्रकार उजेडात आल्यानंतरही पश्चिम झाेन कार्यालयातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांकडून ‘त्या’ कंत्राटदारावर कारवाइ हाेत नसल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्हं उपस्थित हाेत आहेत.