Akola Crime ४० वर्षीय इसमाची धारधार शस्त्राने हत्या, ८ ते १० संशयित ताब्यात! जागेच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १ एप्रिल :- Akola Crime अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बटवाडी बुद्रुक गावात काल रात्री घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बटवाडीतील नितीन सुधाकर आखरे (४०) या ट्रकचालकाची रात्रीच्यावेळी अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

हा प्रकार रविवारी सकाळी ३ वाजताच्या सुमारास घडला असून रात्रभर आखरे त्यांच्या ट्रकवरच झोपलेले होते. त्यांची पत्नी सकाळी मजुरीसाठी उठवायला गेल्यावर हा धक्कादायक प्रकार तिच्या निदर्शनास आला. तिने लगेचच बाळापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बाळापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाची सुरुवातीची माहिती अशी आहे की जागेवरून वाद झाल्याने आखरे यांची हत्या करण्यात आली.

बाळापूर पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वानपथकाची देखील मदत घेण्यात आली. श्वानपथकाच्या साह्याने पोलिसांना ८ ते १० संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना अकोला जिल्ह्यातील बटवाडीसारख्या शांत गावातून घडल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. पोलिसांकडून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा बळावत चालली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!