अकोला शहरात विकास आणि सकारात्मक प्रचाराच्या जोरावर महानगरपालिकेत भगवा झेंडा फडकवून राज राजेश्वर नगरीचा सन्मान वाढवण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. सेवा, संकल्प आणि जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर ही वाटचाल राहील, असे प्रतिपादन रणधीर सावरकर यांनी मतदारांशी संवाद साधताना केले.
अकोला शहरातील १८ प्रभागांमध्ये छोट्या-छोट्या सभा, बैठका आणि घराघरांतील संवादातून भाजपने नागरिकांशी थेट संपर्क वाढवला आहे. या उपक्रमात अनुप धोत्रे, महिला आघाडी, जयंत मसने, विजय अग्रवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. आतापर्यंत २७,४२४ नागरिकांशी संवाद साधल्याचा दावा पक्षाने केला आहे.
खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की, ई-बस सेवा, रुग्णालये, विमानतळ, क्रीडा संकुल, पोलीस वसाहत, शहरातील रस्ते अशा नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकासकामांवर भाजपने सातत्याने भर दिला आहे. जनतेचा विश्वास हीच भाजपची खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच धर्तीवर आमदार वसंत खंडेलवाल यांनीही विविध क्षेत्रांतील नागरिकांशी संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला.
सेवा, समर्पण आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित हा जनसंवाद अधिक तीव्र करत भारतीय जनता पक्ष अकोल्यात विकासकेंद्रित राजकारणाचा संदेश देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.





