शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी अखेर दिलास्याची बातमी समोर आली आहे. वयोमर्यादेच्या अडथळ्यामुळे संधी हुकलेली वाटत असतानाच, आता त्या आशांना नवे बळ मिळाले आहे. गट-ब आणि गट-कच्या परीक्षांसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांच्या मनातील अस्वस्थता दूर करत, एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. “आता संधी मिळेल का?” या प्रश्नावर होकाराची मोहर बसली असून, स्पर्धा परीक्षांच्या रणांगणात पुन्हा एकदा अनेक उमेदवार उतरणार आहेत. मात्र ही संधी एकदाच असून, वेळ मर्यादित आहे. त्यामुळे संधी हुकू न देता अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरणे आता निर्णायक ठरणार आहे.
शासकीय सेवेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय घेत (एमपीएससी) ने गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे यापूर्वी वयोमर्यादा ओलांडल्याने अर्ज करू न शकलेल्या पात्र उमेदवारांना आता नवीन संधी मिळणार आहे.

एमपीएससीने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या जाहिरातींच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. एक वेळची विशेष बाब म्हणून ही सवलत देण्यात आली असून, त्याचा थेट फायदा वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना होणार आहे. उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
राज्यात मागास वर्गांसाठी शासकीय सेवांतील आरक्षणाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून सुधारित मागणीपत्रे एमपीएससीला प्राप्त झाली होती. त्यानुसार आयोगाने जाहिराती प्रसिद्ध केल्या असून, आता वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे अनेक उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 6 जानेवारी अशी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवरच प्रवेश देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, उशिरा का होईना पण संधी मिळाल्याची भावना उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. आता अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करून ही सुवर्णसंधी साधण्याचे आवाहन एमपीएससीकडून करण्यात आले आहे.






