राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मात्र अनेक महिलांना अजूनही मिळालेला नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या दोन महिन्यांचा हप्ता अद्याप खात्यावर जमा न झाल्याने लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे अनेक महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, खाते तपासण्यासाठी आणि हप्ता आला की नाही याची खात्री करण्यासाठी महिलांच्या बँकांमधील फेऱ्या वाढल्या आहेत. काही ठिकाणी तर दिवसभर रांगेत उभे राहूनही ठोस उत्तर मिळत नसल्याची तक्रार महिलांकडून केली जात आहे.

नगरपरिषद निवडणुकांनंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे हा निधी रखडल्याची चर्चा असली, तरी प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
योजनेच्या हप्त्यावर अनेक महिलांचे घरखर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा अवलंबून आहेत. त्यामुळे दोन महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. “पैसे कधी येणार?” हा एकच प्रश्न सध्या लाडक्या बहिणी विचारत आहेत.
आता या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा रखडलेला हप्ता नेमका कधी जमा होणार, याकडे राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर स्पष्ट भूमिका आणि निधी वितरणाची तारीख जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






