अकोला शहराच्या राजकारणात सध्या एकच गोंधळ उडालाय—तिकीट कोणाला आणि उमेदवारी कुणाच्या नशिबी? १५ जानेवारीला होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. पक्ष कार्यालयांपासून प्रशासकीय दालनांपर्यंत गर्दी, धावपळ आणि दबावाचं राजकारण सुरू झालं असून, उमेदवारी मिळवण्यासाठी आज मित्र तर उद्या प्रतिस्पर्धी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अकोला शहर महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची अक्षरशः उदंड गर्दी उसळली असून, प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. व्यूहरचना आखली जात असतानाच, तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी अनेक इच्छुकांनी सुरू केली आहे.
प्रमुख पक्षांसह छोट्या राजकीय संघटनांमध्येही इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली असून, एका जागेसाठी अनेक दावेदार उभे ठाकल्याचं चित्र आहे. पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून, काही ठिकाणी ऐनवेळी नवीन नावे पुढे केल्याने नाराजी आणि धुसफूसही उफाळून आली आहे. कालपर्यंत एका पक्षात असलेले आज दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र दिसत असून, “एकाने नाही संधी दिली, तर दुसऱ्याकडे जाणार” अशी मानसिकता इच्छुकांमध्ये बळावत आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल २० प्रकारची कागदपत्रे आवश्यक असल्याने इच्छुकांची मोठी धावपळ सुरू आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मनपाकडून कागदपत्रे तुलनेने तात्काळ मिळत असल्याचा आरोप होत असताना, सर्वसामान्य इच्छुकांना मात्र कागदपत्रांसाठी मोठा आटापिटा करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, मनपा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना ‘गुत्तेदार नसल्याचे स्वघोषणापत्र’ देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीला हे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यावे लागेल, असा गैरसमज पसरल्याने इच्छुकांची एकच धावपळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हजारो अर्ज जमा झाल्यानंतर विभागही गोंधळून गेला. अखेर हे केवळ स्वघोषणापत्र असल्याचे स्पष्ट झाल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला.
एकंदरीत, अकोला महानगरपालिका निवडणूक केवळ पक्षांमधील लढत न राहता, इच्छुकांची संख्या, पक्षांतर्गत संघर्ष आणि प्रशासकीय गोंधळ यामुळे अधिकच रंगतदार होत चालली आहे. तिकीट वाटप जाहीर होताच या रणधुमाळीत आणखी मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





