आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्तासमीकरणे बदलत असून, कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या घडामोडी आज प्रत्यक्षात येताना दिसत आहेत.
मुंबईत अपेक्षेप्रमाणे ठाकरे बंधूंच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. बुधवारी दुपारी आणि यांच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र येत असल्याने मुंबईतील राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. ही युती थेट भाजपसाठी आव्हान ठरणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत.
मुंबईत घडामोडी वेग घेत असतानाच पुण्यातही मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. काका शरद पवारांविरोधात बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेस फोडणारे अजित पवार आता पुणे आणि पिंपरी–चिंचवडमध्ये पुन्हा शरद पवारांसोबत आघाडी करण्याच्या हालचाली करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
मात्र, या संभाव्य आघाडीला राष्ट्रवादीतूनच तीव्र विरोध सुरू झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटासोबत आघाडी करण्यास स्पष्ट विरोध दर्शवत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
दरम्यान, पुण्यात कडून काँग्रेसला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे. जर हे समीकरण प्रत्यक्षात उतरले, तर पुणे आणि पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये सत्तासंघर्ष अधिक तीव्र होणार आहे.
एकीकडे ठाकरे बंधूंची युती, तर दुसरीकडे पवार कुटुंबातील संभाव्य जवळीक आणि त्यातून निर्माण होणारा अंतर्गत संघर्ष… महापालिका निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड वेगाने ढवळून निघत आहे. येत्या काही दिवसांत कोण कोणासोबत आणि कोण विरोधात उभं राहतं, यावरच राज्यातील महापालिकांचा सत्ता नकाशा ठरणार आहे.





