मुर्तीजापुर उपविभागात प्रशासनाच्या दणक्याच्या घोषणा हवेत विरत असताना जमिनीवर मात्र अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू आहे. गुन्हेगारी मोडून काढण्याच्या नावाखाली जाहीर करण्यात आलेले ‘ऑपरेशन प्रहार’ प्रत्यक्षात कागदापुरतेच मर्यादित राहिले की काय, असा संतप्त सवाल आता नागरिकच विचारू लागले आहेत. बार्शीटाकळी ते बोरगावमंजूपर्यंत दारू, मटका, जुगार, गुटखा, पेट्रोल विक्री आणि गॅस रिफरिंग खुलेआम सुरू असताना प्रशासनाची नजर नेमकी कुठे आहे, हाच या बातमीचा केंद्रबिंदू ठरतो आहे.
अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेले ‘ऑपरेशन प्रहार’ मुर्तीजापुर उपविभागात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बार्शीटाकळी, बोरगावमंजू आणि लगतच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, वरली मटका, जुगार, गुटखा, बेकायदेशीर पेट्रोल विक्री आणि गॅस रिफरिंग बेधडक सुरू असून, गुन्हेगारांना कोणाचीही भीती उरलेली नाही.
दिवसा ढवळ्या विनानंबर दुचाकींवरून दारूच्या पेट्या वाहून नेल्या जात आहेत, मुख्य चौकात आणि वस्त्यांमध्ये कॅनमधून पेट्रोल विक्री सुरू आहे, तर अनेक ठिकाणी घरगुती सिलिंडरमधून गॅस रिफरिंगचा धंदा सर्रास चालतोय. हे सगळे प्रकार संबंधित यंत्रणांच्या नजरेत कसे पडत नाहीत, हा प्रश्न आता केवळ संशयाचा न राहता थेट आरोपात बदलत आहे. त्यामुळे कारवाया केवळ कागदोपत्री, आकडेवारीपुरत्या आणि दिखाऊ असल्याची भावना बळावत आहे.

अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेले ‘ऑपरेशन प्रहार’ मुर्तीजापुर उपविभागात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बार्शीटाकळी, बोरगावमंजू आणि लगतच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, वरली मटका, जुगार, गुटखा, बेकायदेशीर पेट्रोल विक्री आणि गॅस रिफरिंग बेधडक सुरू असून, गुन्हेगारांना कोणाचीही भीती उरलेली नाही.
या अवैध धंद्यांचा सर्वाधिक फटका महिला, युवक आणि शालेय वयातील मुलांनाच बसत आहे. व्यसनाधीनतेमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असून, घरगुती वाद, मारहाणी, अपघात आणि गुन्हेगारी घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. आज परिस्थिती अशी आहे की “गाव तिथे अवैध धंद्यांची शाखा” असे चित्र दिसून येत आहे.
यामागे कुणाचा वरदहस्त आहे? काही ठिकाणीच कारवाई का होते? कारवाया संगनमताने तर होत नाहीत ना? असे थेट, बोचरे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. “ऑपरेशन प्रहार”चा दणका प्रत्यक्ष जमिनीवर दिसत नसून, तो केवळ प्रेसनोट आणि घोषणांपुरताच मर्यादित राहिला आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होतो.

प्रशासनाने आता केवळ आश्वासनांवर वेळ न घालवता कठोर, सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष कारवाई केली नाही, तर जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘ऑपरेशन प्रहार’ प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि कुणावर होणार? याकडे संपूर्ण मुर्तीजापुर उपविभागाचे लक्ष लागले आहे.