WhatsApp

अकोला महापालिका रणसंग्राम: भाजपचा किल्ला धोक्यात? वंचित–काँग्रेससह ‘तिसरी आघाडी’ ठरतेय गेमचेंजर

Share

राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांकडे लक्ष लागले असताना अकोला महानगरपालिकेची लढत मात्र सर्वाधिक चर्चेत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने अकोला महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत ८० पैकी तब्बल ४८ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपचं कमळ पूर्ण बहरात फुललं होतं. मात्र आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा हीच सत्ता टिकवण्याचं आव्हान भाजपसमोर उभं ठाकलं आहे.



या निवडणुकीत अकोला महापालिका भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, वाहतूक कोंडी, बेरोजगारी अशा अनेक ज्वलंत प्रश्नांमुळे ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे तर थेट जनतेच्या जीवनाशी जोडलेली ठरत आहे. भाजप शहराचा विकास केल्याचा दावा करत असताना काँग्रेस मात्र “भाजपचा विकास झाला, शहराचा नाही” अशी बोचरी टीका करत मैदानात उतरली आहे.

भाजप सत्तेत आल्यानंतर काही अपक्ष नगरसेवकही भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र गेल्या तीन वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर पाच नगरसेवक अजित पवार गटात गेले, तर एका नगरसेविकेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर सहा नगरसेवक शिंदे गटात गेले, तर दोन नगरसेवक उबाठा गटात कायम राहिले. विधानसभेच्या तोंडावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलिमचंदानी यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. काँग्रेसचे नगरसेवक जिशान हुसेन यांनीही वंचितची वाट धरली.

भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने पाच वर्षांत अनेक मोठे निर्णय घेतल्याचा दावा केला जातो. शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे सुरू झाली, अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली, नव्या नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम करण्यात आले. तीन उड्डाणपूल उभारले गेले. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २४ गावांच्या विकासासाठी राज्य सरकारकडे ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय, नवीन तरणतलावाचे काम, तसेच आमदारांच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू करण्यात आल्याचा भाजपचा दावा आहे. या सगळ्याच्या जोरावरच भाजप ऐतिहासिक विजयाचा दावा करत आहे.

Watch Ad

मात्र या वेळी भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे ती भाजपविरोधात उभी राहिलेली नाराज आजी-माजी नगरसेवकांची तिसरी आघाडी. तीस वर्षांपासून नगरसेवक असलेले हरीश अलिमचंदानी, डॉ. अशोक कोळंबे, आशिष पवित्रकार, गिरीश गोखले यांच्यासह सात आजी-माजी नगरसेवक या आघाडीत एकत्र आले आहेत. ही आघाडी भाजपच्या पारंपरिक मतांवरच घाव घालणार असल्याने भाजपची चिंता वाढली आहे.

अकोला महापालिकेची ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यापुरती मर्यादित न राहता, भाजपचा किल्ला टिकणार की कोसळणार, की तिसरी आघाडी इतिहास घडवणार याचा फैसला करणारी ठरणार आहे. त्यामुळे अकोल्याच्या रणभूमीत यंदा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!