राजकारणात सत्ता असो वा नसो, कायद्यापासून कुणाचीही सुटका नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यासाठी सध्या प्रत्येक क्षण निर्णायक ठरत आहे. मंत्रिपदाचा राजीनामा, अटक वॉरंट, पोलिसांची हालचाल आणि रुग्णालयातील उपचार… या सगळ्यात कोकाटेंचं राजकीय अस्तित्व थेट पणाला लागलं आहे.
बुधवारी माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर थेट रुग्णालयाची वाट धरली. ब्लडप्रेशर वाढणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे कारण देत ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले. सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. मात्र, याचवेळी नाशिक न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अटक टाळण्यासाठी रुग्णालय?
कोकाटे यांच्याविरोधात शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप सिद्ध झाला असून, न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात नाशिक न्यायालयाने बुधवारी अटक वॉरंट काढले.
अटक टाळण्यासाठी कोकाटेंनी उच्च न्यायालयात तातडीची धाव घेतली. मात्र, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत सुनावणी घेण्यास नकार दिल्याने त्यांचा मोठा धक्का बसला. त्यामुळे आता “रुग्णालयात दाखल होणं हे अटकेपासून वाचण्यासाठीचं पाऊल आहे का?” अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक पोलिसांची हालचाल, मुंबईत पथक जाणार?
नाशिक पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण होताच कोकाटेंना अटक केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांचं एक पथक आज मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे. रुग्णालयात असतानाही अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिपद गेलं, आता आमदारकीही धोक्यात
माणिकराव कोकाटे यांच्यासाठी ही केवळ मंत्रिपदाची बाब राहिलेली नाही. याआधी त्यांचं कृषी मंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं, आता क्रीडा मंत्रीपदावरूनही पायउतार व्हावं लागलं. पण खरी धोक्याची घंटा म्हणजे आमदारकीवरही टांगती तलवार आहे.
३० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यामुळे दोषी ठरल्यास आमदारकी रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकारणात खळबळ, एकामागोमाग एक राजीनामे
धनंजय मुंडे यांच्यानंतर आता माणिकराव कोकाटेंनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. सत्ता, पद आणि प्रभाव असूनही कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, असा संदेश या प्रकरणातून जात आहे.
पुढे काय?
कोकाटेंना आजच अटक होणार का?
रुग्णालयातील उपचार अटकेला आड येणार का?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची आमदारकी वाचणार का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता काही तासांतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एक मात्र नक्की… ३० वर्षांपूर्वीचं प्रकरण आज माणिकराव कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीवर पूर्णविराम ठरू शकतं.






