WhatsApp

महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेनेत मोठे संघटनात्मक फेरबदल; अकोला जिल्ह्यात नवे पदाधिकारी जाहीर

Share

आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल करत अकोला जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.



महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवणे, शहर व विधानसभा स्तरावर प्रभावी समन्वय साधणे आणि कार्यकर्त्यांना सक्रियपणे मैदानात उतरवणे हा या संघटनात्मक फेरबदलांचा मुख्य उद्देश असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेला अधिक आक्रमक आणि सक्षम करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांनुसार आशिष गावंडे यांची अकोला शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेंद्र विसपुते यांच्याकडे उपजिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून राजू चव्हाण यांची शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रशांत मानकर यांची शहर युवा अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

शेतकरी प्रश्नांना अधिक प्राधान्य देण्यासाठी शिवा मोहोड यांची शेतकरी सेना जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच गंगाधर ढोरे आणि भूषण भिरह यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. पक्षातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अश्विन पांडे यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Watch Ad

नवीन पदाधिकाऱ्यांवर अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर या विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली असून, प्रत्येक विभागात संघटन विस्तार, मतदारांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या संघटनात्मक फेरबदलांमुळे अकोला शहर व जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने उतरल्याचे चित्र दिसेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. ही माहिती शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!