गरिबांच्या हक्काच्या योजनेत दलालीचा किडा शिरलाय की काय?
समाजकल्याण विभागाच्या नावाखाली सुरू असलेल्या लाचखोरीच्या साखळीचा आणखी एक धक्कादायक पर्दाफाश अकोल्यात झाला आहे. आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान मिळवून देण्याच्या बदल्यात लाच मागणाऱ्या एका खासगी शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर झालेली ही कारवाई म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेला बसलेला जोरदार चपराकच म्हणावी लागेल.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शैलेंद्र तुळशीराम बगाटे (वय ४३) असून तो खासगी शिक्षक असल्यासोबतच व्यवसाय एजंट म्हणूनही काम करत होता. अकोला शहरातील खदान येथील कैलास टेकडी परिसरात तो वास्तव्यास आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देतो, असे सांगत सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याचा धंदा तो करत असल्याचा आरोप आहे.

हक्काचे पैसे देण्यासाठी ‘खुर्चीखालचा सौदा’
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने १३ जून २०२५ रोजी आंतरजातीय विवाह केला होता. शासनाच्या नियमांनुसार अशा पात्र जोडप्याला ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. त्यासाठी तक्रारदाराने २ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद, अकोला येथील समाजकल्याण विभागात सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला.
महिने उलटले, पण अनुदानाचा पत्ता नाही. अखेर तक्रारदार चौकशीसाठी समाजकल्याण विभागात गेला. तिथेच भेटला हा ‘एजंट’.
“काम करून देतो… पण ५ हजार रुपये द्यावे लागतील,” असा थेट सौदा बगाटेने मांडला. म्हणजे हक्काचे ५० हजार मिळवायचे असतील, तर आधी खिशातून ५ हजार द्यायचे!
नकार दिला, थेट एसीबीकडे धाव
लाच देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर तक्रारदाराने १७ डिसेंबर २०२५ रोजी अकोला येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. एसीबीने तात्काळ हालचाली सुरू करत शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली.
पडताळणीदरम्यान आरोपीने
➡️ पहिल्या टप्प्यात ३ हजार रुपये घेण्याची तयारी
➡️ उर्वरित २ हजार रुपये नंतर घेण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा परिषदेसमोरच सापळा, रंगेहाथ अटक
त्यानंतर एसीबीने सापळा रचला. जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोपीने तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. समाजकल्याण विभागाच्या नावाखाली सुरू असलेल्या दलालीचा हा थेट पुरावा ठरला.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा
या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी अकोला पथकाने केली आहे.
‘लाच मागितली तर गप्प बसू नका’
एसीबी अकोलाकडून स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की,
कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरो अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा.
लाच देणारा नव्हे, तर लाच मागणारा गुन्हेगार आहे, हे पुन्हा एकदा या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
समाजकल्याणाच्या नावाखाली जर लाचखोरीचं जाळं विणलं जात असेल, तर अशा ‘एजंटां’वर एसीबीची कारवाई ही केवळ सुरुवात आहे… आता प्रश्न इतकाच, पुढचा नंबर कुणाचा?





