५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला बॉलिवूडचा स्पाय-अॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) सध्या सिनेसृष्टीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दहा दिवसांतच या चित्रपटाने जगभरातून ₹५०० कोटींची कमाई करत बॉलिवूडला नवी दिशा दिली आहे. लेखक-दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवलं आहे.
‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंग, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पंदोर आणि बालकलाकार सारा अर्जुन यांच्या भूमिकाही कथेला बळ देणाऱ्या ठरल्या आहेत. मात्र केवळ स्टारकास्ट नव्हे, तर या चित्रपटाच्या यशामागे अनेक ठोस कारणं आहेत.
सशक्त पटकथा – यशाची खरी गुरुकिल्ली
‘धुरंधर’च्या यशामागील सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची पटकथा. हा चित्रपट स्पाय थ्रिलर जॉनरमध्ये मोडत असला, तरी तो केवळ अॅक्शनपुरता मर्यादित राहत नाही. पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड, राजकारणाची गुंतागुंत आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थानं अतिशय सूक्ष्म पद्धतीने मांडण्यात आली आहेत. जवळपास तीन तासांचा कालावधी असतानाही प्रेक्षकांना कुठेही कंटाळा येत नाही. सतत येणारे ट्विस्ट्स, थरारक घडामोडी आणि राष्ट्रभावनेची खोली यामुळे चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
कलाकारांचा दमदार अभिनय
या चित्रपटातून रणवीर सिंगने जबरदस्त कमबॅक केला आहे. त्याचे एनर्जेटिक अॅक्शन सीन्स आणि भावनिक अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. संजय दत्तचा भारदस्त वावर, अर्जुन रामपालची इंटेन्सिटी आणि आर. माधवनचा सूक्ष्म, अभ्यासपूर्ण अभिनय चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.
विशेष उल्लेख करावा लागेल तो अक्षय खन्ना यांचा. ‘धुरंधर’मध्ये त्यांनी साकारलेला रेहमान डकैत हा कॅरेक्टर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. ‘शेर-ए-बलोच’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असून, जगभरातून लाखो रिल्स तयार करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी रॅप आणि ९०च्या दशकातील म्युझिकचा मिलाफ चित्रपटाची री-प्ले व्हॅल्यू वाढवतो.
तांत्रिक बाजू मजबूत
‘धुरंधर’ची तांत्रिक बाजू अत्यंत भक्कम आहे. हाय-ऑक्टेन अॅक्शन सीन्स, क्रिस्प एडिटिंग आणि दर्जेदार व्हिज्युअल इफेक्ट्स यामुळे हा चित्रपट हॉलीवूड लेव्हलचा अनुभव देतो. आदित्य धर यांनी ‘आउट ऑफ द बॉक्स’ मांडणी करत बॉलिवूडला वेगळा कंटेंट दिला आहे. याशिवाय चित्रपटाचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी देखील यशस्वी ठरली. ट्रेलर आणि गाण्यांच्या टीझर्सनी रिलीजआधीच मोठा हायप निर्माण केला होता.
वाद, बंदी आणि तरीही विक्रमी कमाई
धुरंधर चित्रपट पाकिस्तानविरोधी असल्याच्या आरोपांमुळे वादात सापडला. बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई या काही मध्यपूर्वेतील देशांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली. मात्र तरीही भारतासह इतर देशांमध्ये या चित्रपटाने ₹३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून एकूण कमाई ₹५०० कोटींच्या पुढे गेली आहे.
बॉलिवूडसाठी दिशादर्शक यश
‘धुरंधर’चं यश हे बॉलिवूडसाठी एक दिशादर्शक उदाहरण ठरत आहे. सशक्त कथा, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि दर्जेदार अभिनय असेल, तर प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात, हे या चित्रपटाने सिद्ध केलं आहे. त्यामुळेच आता प्रेक्षकांमध्ये ‘धुरंधर २’ बद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
एकंदरीत, ‘धुरंधर’ हा केवळ सुपरहिट चित्रपट नाही, तर कंटेंटवर विश्वास ठेवणाऱ्या नव्या बॉलिवूडचा आत्मविश्वास आहे.





