महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था किती भयावह झाली आहे, याचा अंगावर काटा आणणारा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात उघडकीस आला आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी थेट शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने माणुसकीलाच काळिमा फासला आहे. “देवाभाऊ, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?” असा संतप्त सवाल समाजातून केला जात आहे.
या अमानुष घटनेचा बळी ठरलेले शेतकरी म्हणजे रोशन सदाशिव कुडे. चार एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रोशन कुडे यांचे आयुष्य निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सततच्या नुकसानामुळे शेतीतून उत्पन्न मिळेना. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुधाळ गाई खरेदी करण्यासाठी त्यांनी दोन खासगी सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये, असे एकूण एक लाख रुपये कर्ज घेतले.
मात्र नशीब येथेही त्यांच्या बाजूने नव्हते. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या. त्याचवेळी शेतीतही पीक आले नाही. उत्पन्नाचा एकही मार्ग उरला नाही आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकारांकडून सतत तगादा सुरू झाला. घरात येऊन अपमानास्पद भाषा, धमक्या दिल्या जाऊ लागल्या. कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी दोन एकर जमीन विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील साहित्यही विकून टाकले. मात्र तरीही कर्ज फिटले नाही.
या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एक लाख रुपयांचे कर्ज तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत वाढले. अवैध सावकारी, प्रचंड व्याजदर आणि मानसिक छळ यामुळे रोशन कुडे पूर्णपणे खचून गेले. अखेर कर्ज दिलेल्या एका सावकाराने त्यांना थेट “किडनी विक” असा सल्ला दिला. या सल्ल्यानेच या प्रकरणाने माणुसकीची सर्व सीमा ओलांडली.

एका एजंटच्या माध्यमातून रोशन कुडे यांना प्रथम कोलकाता येथे नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पंबोडिया देशात नेण्यात आले, जिथे शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली. ही किडनी त्यांनी आठ लाख रुपयांना विकली. मात्र इतकं करूनही कर्ज पूर्णपणे फिटले नाही. कर्जासाठी अवयव गमावूनही त्यांच्या हाती काहीच उरले नाही.
या संपूर्ण प्रकारानंतरही प्रशासन आणि पोलिसांनी वेळेवर दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप रोशन कुडे यांनी केला आहे. “मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती, पण कोणीही दखल घेतली नाही. वेळीच कारवाई झाली असती, तर मला किडनी विकण्याची वेळ आली नसती,” असे ते म्हणाले. आजही सावकारांकडून पैशाचा तगादा सुरू असून, कर्जासाठी किडनी गेल्यानंतरही त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.
हताश अवस्थेत रोशन कुडे यांनी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आता हाती काहीच उरलेलं नाही. संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करून मोकळं व्हायचं,” असे उद्गार त्यांनी काढले असून, यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सहा सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर बावनकुळे, मनीष घाटबांधे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे आणि सत्यवान बोरकर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार कलम २९, ३१ आणि ३२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, किडनी विक्री प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी दिली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर किडनी कर्जफेडीसाठीच विकली का, पंबोडिया देशात नेण्याची व्यवस्था कुणी केली, एजंट कोण होता, आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संबंध कुणाशी आहे, याचा तपास होणार आहे. त्यामुळे सध्या किडनी विक्रीसंदर्भात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
कर्ज, अवैध सावकारी आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या घटनेने पुन्हा एकदा समोर आली आहे. बळीराजाच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून केवळ आकडेवारीत मदतीचे दावे करणाऱ्या व्यवस्थेवर आता कठोर प्रश्न उपस्थित होत आहेत.






