WhatsApp

महापालिकेच्या रणधुमाळीत तिसरा पर्याय; भाजपच्या घरातच बंडखोरीचा भडका!

Share

आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपसमोर यंदा केवळ विरोधकांचेच नव्हे, तर पक्षांतर्गत नाराजीचेही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महापालिका निवडणूक लढण्यासाठी भाजपमध्येच इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने उमेदवारी वाटपाचा ताण पक्ष नेतृत्वावर स्पष्टपणे जाणवत आहे. याच इच्छुकांमधून नाराजी, असंतोष आणि बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता वाढली असून, त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोपी राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.



दरम्यान, भाजपमधील नाराज गटाने वेगळी चूल मांडत मतदारांसमोर ‘तिसऱ्या आघाडी’चा पर्याय उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्याने अकोल्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची, रंगतदार आणि अनिश्चित बनण्याची चिन्हे आहेत.

तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; भाजपचा नाराज गट एकवटतोय

गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये एक नाराज गट सक्रिय आहे. पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेत आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप हा गट करत आला आहे. या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी प्रदेश पातळीवरून प्रयत्न झाले, मात्र ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील सर्व नाराज नेते, तसेच उमेदवारी न मिळणारे इच्छुक यांना एकत्र आणून स्वतंत्र आघाडी उभारण्याचे प्रयत्न वेग घेत आहेत.

या संभाव्य आघाडीच्या माध्यमातून मतदारांना तिसरा पर्याय देण्याची रणनीती आखली जात असून, यामुळे भाजपच्या मतांवर मोठा फटका बसू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सध्या भाजपमध्ये दोन स्पष्ट गट असल्याचे चित्र आहे. एक गट माजी खासदार व केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांचा मानला जातो, तर दुसरा गट माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा आहे.

Watch Ad

बंडखोर पुन्हा मैदानात

डॉ. रणजित पाटील समर्थक असलेल्या बंडखोर नेत्यांनी आता नव्या आघाडीच्या दिशेने ठोस पावले टाकली आहेत. डॉ. रणजित पाटील यांचे पुतणे आणि सलग दोन वेळा नगरसेवक राहिलेले आशिष पवित्रकार यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी आकार घेत आहे. या आघाडीत माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी आणि माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांचा समावेश आहे. यासंदर्भात शहरातील ‘बंधन लॉन’ येथे सहविचार सभा पार पडली असून, या सभेला भाजपमधील अनेक नाराज नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

बंडखोरीचा इतिहास आणि संभाव्य परिणाम

यापूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपमधील बंडखोरीचा मोठा फटका पक्षाला बसला होता. हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत तब्बल 21 हजारांहून अधिक मते घेतली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांचा अवघ्या 1283 मतांनी पराभव झाला आणि तीन दशकांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला. त्या निवडणुकीत काँग्रेसचे साजिद खान पठाण अकोला पश्चिमचे आमदार म्हणून निवडून आले. डॉ. अशोक ओळंबे यांनीही अपक्ष म्हणून 2100 मते घेतली होती.

या पार्श्वभूमीवर भाजपने या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आता हेच सर्व नाराज आणि बंडखोर नेते पुन्हा एकत्र येत भाजपसमोर मोठे आव्हान उभे करत आहेत. लवकरच या नव्या आघाडीचे नाव आणि स्वरूप जाहीर होणार असून, अकोला महापालिका निवडणुकीतील राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!