हजारो वर्षांपूर्वी अवकाशातील घडामोडीतून निर्माण झालेलं आणि आजही जगातील शास्त्रज्ञ, संशोधक व विज्ञान क्षेत्रासाठी कोडं ठरलेलं लोणारचं खारं सरोवर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक संशोधनाच्या युगातही या सरोवरातील अनेक रहस्यांचा उलगडा अद्याप झालेला नाही.
संशोधनानुसार सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातातून लोणार सरोवराची निर्मिती झाली. आयआयटी पवई (मुंबई) च्या पथकासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी येथे अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे, लोणार सरोवरात आढळणाऱ्या खनिजांमध्ये आणि चंद्रावरील खडकांमध्ये साम्य आढळून आल्याने या सरोवराचं वैज्ञानिक महत्त्व अधिक वाढलं आहे.
धारा तीर्थ (गोमुख धार), सरोवर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता, विविध स्थापत्यशैलीतील हेमाडपंथी मंदिरे, तसेच दैत्यसूदन मंदिरातील विष्णूच्या मूर्तीवर ठराविक काळात होणारा सूर्यकिरणांचा किरणोत्सव या सर्व बाबी लोणारचं गूढ अधिकच गडद करतात.
मात्र यंदा लोणार सरोवर वेगळ्याच कारणामुळे चिंतेचा विषय ठरत आहे. मागील सहा महिन्यांपासून खाऱ्या पाण्याच्या या सरोवराची जलपातळी सातत्याने वाढत आहे. पावसाळ्यात लोणार तालुक्यात विक्रमी आणि वारंवार अतिवृष्टी झाल्याने तेव्हा ही वाढ फारशी गंभीर मानली गेली नाही. पण आता कडाक्याच्या हिवाळ्यातही पाण्याची पातळी वाढतच असल्याचं चित्र समोर आलं असून, यामुळे शास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये चिंता वाढली आहे.
या वाढत्या जलपातळीचा सर्वात मोठा फटका सरोवर परिसरातील ऐतिहासिक वारशाला बसत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, कमळजा देवीचं मंदिर आजवर कधीही पाण्याखाली गेलं नव्हतं. मात्र यंदा हे मंदिर १० ते १५ फूट पाण्यात गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे लोणार सरोवराच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जलपातळी वाढल्याने सरोवरातील वैशिष्ट्यपूर्ण खाऱ्या पाण्याच्या रचनेवर आणि जैविक संतुलनावरही परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्यात मासे कसे आढळतात, पाण्याची वाढ नेमकी कुठून आणि का होते, यासारखे मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
देश-विदेशातून शास्त्रज्ञ आणि पर्यटक लोणारला भेट देत असतानाही, या दुर्मिळ नैसर्गिक वारशाकडे शासन, संशोधन संस्था आणि पुरातत्व विभागाकडून आवश्यक तेवढं लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप स्थानिक पर्यावरणप्रेमी व अभ्यासक करत आहेत. लोणार सरोवरावरील वाढती जलपातळी ही केवळ कुतूहलाची नव्हे, तर तत्काळ व्यापक आणि सखोल संशोधनाची गरज अधोरेखित करणारी गंभीर बाब असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
लोणार सरोवराचं हे बदलतं स्वरूप भविष्यात कोणते नवे रहस्य उघड करणार, की आणखी संकटं निर्माण करणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.





