WhatsApp

चिखलदरा घाटात क्षणात सगळं बदललं; बस वाचवताना चालकाचा अंत

Share

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा घाटात एक धक्कादायक आणि हळहळजनक घटना घडली आहे. घाटात उभी असलेली ट्रॅव्हलर बस अचानक उताराच्या दिशेने सरकू लागली आणि क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली. गाडी दरीत जाण्यापासून थांबवण्याच्या प्रयत्नात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.



नेमकं घडलं काय तर, ट्रॅव्हलर बसमधील एका प्रवाशाला अचानक उलटी आल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्या वेळी सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले होते. घाटातील उतारावर बस उभी असतानाच, अचानक ती पुढे सरकू लागली आणि थेट दरीच्या दिशेने जाऊ लागली.

ही बाब लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उताराचा वेग अधिक असल्याने बस चालकाच्या अंगावरून गेली. या भीषण अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चालकाला वाचवण्यासाठी आणि बस थांबवण्यासाठी पुढे सरसावलेल्या दोन प्रवाशांनीही बस अडवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तेही जखमी झाले.

अपघातानंतर घाट परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे.

Watch Ad

या घटनेमुळे घाट मार्गावरील प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उतारावर वाहन उभे करताना आवश्यक ती खबरदारी, हँडब्रेक, चाकाखाली अडथळे याकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!