महाराष्ट्राच्या सामाजिक आणि कामगार चळवळीतील एक अव्वल नाव, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि झुंजार नेते डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री 8:25 वाजता निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने कामगार चळवळ आणि सामाजिक सुधारणांना दिशा देणारा एक मोठा आधारस्तंभ हरवला आहे.
डॉ. आढाव यांची ओळख केवळ रिक्षाचालक, हमाल आणि असंघटित कष्टकऱ्यांच्या नेत्यांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी आयुष्यभर सामान्य माणसासाठी, त्याच्या हक्कांसाठी आणि सामाजिक समतेसाठी लढा दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना ‘जनसामान्यांचा नेता’ म्हणून ओळख मिळाली.
सामाजिक सुधारणांचे प्रणेते
1970 च्या दशकात डॉ. आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षात ते सक्रिय होते. त्यांनी रिक्षा पंचायतीचे नेतृत्व केले आणि विखुरलेल्या रिक्षाचालकांना संघटित करून त्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष सुरु केला. कामगार हितासाठी त्यांची झुंजार भूमिका आजही आदर्श मानली जाते.
‘एक गाव एक पाणवठा’ ही त्यांची सर्वात महत्त्वपूर्ण सामाजिक मोहीम होती. अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवली गेली. गावोगाव पाणवठे सर्वांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. सामाजिक समतेसाठी त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील.
राजकारणावर तीक्ष्ण भाष्य
वयाच्या 90 नंतरही ते सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. राजकीय परिस्थितीवर त्यांच्या प्रतिक्रिया परखड, थेट आणि स्पष्ट असत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील विभाजनानंतर त्यांनी सत्तासंघर्षावर तीव्र टीका केली होती.
त्यांनी सांगितले होते, “माणूस सकाळी कुठे असेल आणि संध्याकाळी कुठे असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. सत्ता हीच एकमेव भूक झाली आहे.”
सत्तेच्या मोहात राजकारणाचे मूल्य हरवत असल्याचे ते ठामपणे सांगत. सामान्य जनतेला त्यांनी वारंवार संदेश दिला – “काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा.”
93 व्या वर्षीही ते आंदोलनाच्या मैदानात उतरले. हे त्यांच्या जिद्दीचे द्योतक होते.
एक युग संपलं
कामगारांच्या जीवनमानासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या नेत्याच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि कामगार चळवळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक संघटना, नेते आणि कामगार वर्गाने शोक व्यक्त केला आहे.
डॉ. बाबा आढाव यांनी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश स्पष्ट होता – लढा द्या, संघटित व्हा आणि न्याय मिळवा.
त्यांचे व्यक्तिमत्व, विचार आणि कृती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील.






