WhatsApp

अकोला जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक थरार: आमदारांची प्रतिष्ठा पणाला, पैशांच्या खेळाची जोरदार चर्चा; निकालासाठी 21 डिसेंबरची प्रतीक्षा

Share

अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, हिवरखेड, मूर्तिजापूर नगरपालिकांसह बार्शी टाकळी नगरपंचायतीची निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. प्रचारकाळात वातावरण तापलं होतं. आरोपांची मालिका, धुसफूस, कार्यकर्त्यांचे मोर्चे आणि जनसंपर्काची धडाधड चहुबाजूंनी सुरू होती. मतदानाचा दिवस मात्र तुलनेने स्थिर राहिला. पण मतदारांच्या मनात उमेदवारांचे भविष्य काय असेल, हा मोठा प्रश्न कायम राहिला आहे. सर्व मते मतपेटीत बंद झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे.



ही निवडणूक आकाराने स्थानिक असली तरी प्रतिष्ठेच्या दृष्टीने कोणत्याही विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी नव्हती. अकोट-तेल्हारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन बापू देशमुख आणि मुर्तिजापूर-बार्शी टाकळी विधानसभा क्षेत्राचे आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी ही लढत वैचारिक नव्हे तर प्रतिष्ठेची बनली होती. त्यांच्या कट्टर समर्थकांसाठी ही निवडणूक म्हणजे पक्षनिष्ठा आणि वैयक्तिक प्रभावाची खरी परीक्षा होती.

निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे पैशांचे कथित वाटप. शहरात आणि तालुक्यात या विषयावर दिवसभर चर्चा सुरू होती. काही भागांत रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांच्या हालचाली दिसल्या. ज्या पद्धतीने विविध गटांकडून मतदारांशी संपर्क साधला गेला, त्यावर अनेकांनी रोखठोक प्रश्न उपस्थित केले. एवढे खुलेपणाने वाटप झाल्याचे बोलले जात असतानाही एकाही गटाने औपचारिक तक्रार नोंदवलेली नाही, ही बाब नागरिकांमध्ये अधिकच कुतूहल निर्माण करणारी ठरली.

मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा दिसत होत्या. ज्येष्ठ मतदार, तरुण मतदार, महिला आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची उत्साही उपस्थिती दिवसभर कायम राहिली. काही केंद्रांवर दुपारनंतर गीर्दी कमी झाली असली तरी संध्याकाळी पुन्हा मतदारांनी हजेरी लावली. निवडणुकीच्या दिवशी मोठे वाद किंवा गोंधळ निर्माण न झाल्याने प्रशासकीय यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास टाकला.

Watch Ad

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार एका प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून ती 20 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंतिम निकालासाठी सर्वांना काही दिवस अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. या विलंबामुळे काही उमेदवारांसाठी उत्सुकता आणि तणाव दोन्ही वाढले आहेत. अंतिम निकाल लागेपर्यंत विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक संपली, पण राजकीय हवामान अजून निवळत नाही. मतदार आपापल्या अंदाजाने चर्चा रंगवत आहेत. कोणत्या नगरपालिकेत कोणते राजकीय गट पुढे असतील, पैशांच्या चर्चेचा निकालांवर किती परिणाम होईल, कोणाच्या प्रतिष्ठेला घाव बसेल आणि कोणासाठी यशाचे दार उघडेल, यावर गावोगावी चर्चा घरोघरी सुरू आहे.

21 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू झाल्यानंतरच या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळतील. पण त्याआधी राजकीय वातावरणातली ही घोंगावणारी उत्सुकता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आकड्यांचा खेळ सुरू होईपर्यंत अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी याठिकाणी निवडणुकीचा ताप अजूनही जाणवत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!