अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३ डिसेंबर २०२५:अकोला शहरात हरवलेल्या १४ वर्षांच्या मुलाच्या शोधासाठी तब्बल २१ दिवस पोलिसांनी चालवलेली मोहीम संपली आणि शेवटी पंढरपूर शहरात हा मुलगा सुखरूप सापडला. ही संपूर्ण कारवाई इतकी गुंतागुंतीची होती की कोणालाही वाटेल… हा तपास आहे की एखाद्या रहस्यपटाची कथा.
११ नोव्हेंबरला संध्याकाळी सरकारी गोडाऊन परिसरात राहणारा ऋषीकेश संतोष कनोजीया हा घरातून काहीही न सांगता निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील संतोष कनोजीया यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला. परंतु तपासाची खरी अडचण इथेच होती. मुलगा मोबाइल वापरत होता, पण मोबाइल त्याच्याकडे नव्हता. कोणावरही पालकांचा संशय नव्हता. शिवाय हरवण्याच्या आधीच्या कोणत्याही हालचालींची ठोस माहिती उपलब्ध नव्हती.
सायंकाळी एका प्रतिष्ठित व्हॉट्सअॅप ग्रुपवर हरवलेल्या मुलाची माहिती शेअर झाली. या संदेशासह पोलिस अधीक्षकांना विशेष पथक नेमण्याची विनंतीही पोहोचली. पण आवश्यक असलेली आधार माहिती जवळ नसल्याने तपासाची दिशा सापडत नव्हती. तरीही घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. त्यांनी मुलाच्या शाळा, ट्यूशन, परिसर, मित्रमंडळी, सर्व ठिकाणांची गुप्त तपासणी सुरू केली. पण १६ दिवस उलटूनही मुलाचा मागमूस नव्हता.
या परिस्थितीत मुलाचे आई-वडील स्वतः पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना भेटले. जवळपास एका तासाच्या चर्चेनंतर त्यांनी मुलाचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसडीपीओ, शहर विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाला तपासासाठी लागवड करण्यात आली.
या पथकाने CCTV कॅमेरे वेगळ्या पद्धतीने तपासण्याचा निर्णय घेतला. आणि हाच निर्णय निर्णायक ठरला. खदान पथकाने तपासलेल्या CCTV मधून ११ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता ऋषीकेश हा अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ११४०३ नागपूर–कोल्हापूर एक्सप्रेसमध्ये चढताना दिसला.

माहिती सातत्याने पोचताच पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार १ अधिकारी आणि १० अंमलदारांचं स्वतंत्र पथक तयार करण्यात आलं. या पथकाने नागपूर–कोल्हापूर मार्गावरील वाशिम, हिंगोली, वसमत, पुर्णा, परळी वैजनाथ, लातूर, धाराशिव, सोलापूर मार्गावरील सर्व CCTV तपासले. आणि अखेर पंढरपूर स्टेशनवरील एका कॅमेऱ्यात तो उतरतानाचा क्षण रेकॉर्ड झाला.
मग संपूर्ण पथक पंढरपूरमध्ये उतरलं. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, मंडई, बसस्थानक, चंद्रभागा नदी किनारा, विविध मठ, गल्लीबोळ… जेथे शक्यता तिथे शोधमोहीम. अनेकांना त्याचा फोटो दाखवण्यात आला. सतत मिळणाऱ्या छोट्या-छोट्या माहितीच्या तुकड्यांवर पुढे चालत शेवटी २ डिसेंबरच्या दुपारी सरगम चौकाजवळ मुलगा दिसला आणि पथकाने त्याला सुरक्षित ताब्यात घेतलं.
या संपूर्ण कारवाईत १५० ते २०० CCTV चेक करण्यात आले. सात जिल्ह्यांमध्ये तब्बल १५०० किलोमीटर प्रवास. २० हून अधिक अंमलदारांची धावपळ. कोणताही पुरावा नाही, साक्षीदार नाही, मुलाकडे मोबाइल नाही आणि पालकांकडे स्पष्ट माहिती नाही… अशा परिस्थितीत बालकाचा शोध लावणं हे खरंच कठीण होतं. पण अखेर २१ दिवसांच्या धडपडीला यश आलं आणि मुलगा सुखरूप अकोल्यात आणून त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आला.
या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक वी. चंद्रकांत रेड्डी, एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी शंकर शेळके, मनोज केंदारे, पुरुषोत्तम ठाकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार आणि विशेष पथकातील सर्व सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कठीण परिस्थितीतही पोलिसांनी दाखवलेली चिकाटी आणि संयम हेच या यशाचं मुख्य कारण ठरलं.
२१ दिवसांचा तणाव, पालकांचा आर्त प्रयत्न, पोलिसांची प्रचंड मेहनत आणि CCTV चा एक लहानसा क्लू. या सगळ्यांच्या आधारे अखेर एक जीव वाचला आणि घरात पुन्हा आनंद परतला.





