अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २५ नोव्हेंबर २०२५:बुलढाणा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता चुरशीच्या टोकाला पोहोचली आहे. कडाक्याच्या थंडीतही शहराचे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तिन्ही प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांमध्ये रोमहर्षक संघर्ष रंगतो आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड, भाजपचे तीन वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे आणि महाविकास आघाडीचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांची धर्मपत्नी लक्ष्मी काकस यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.
ही निवडणूक केवळ तिन्ही प्रमुख महिला उमेदवारांमुळेच महत्त्वाची ठरलेली नाही, तर त्यांच्या मागे उभे असलेले राजकीय बालेकिल्ले आणि प्रतिष्ठेची लढत ही मुख्य कारणे आहेत. बुलढाणा हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होम टाऊन असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने उतरणाऱ्या लक्ष्मी काकस या स्थानिक काँग्रेस समर्थकांसाठी महत्त्वाची उमेदवार ठरत आहेत.
या तिरंगी मुकाबल्यात सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने संगीता हिरोळे यांना उमेदवार करून काँग्रेसची डोकेदुखी वाढवली होती. वंचितच्या प्रवेशाने या लढतीचे समीकरण पूर्णतः बदलले होते. मात्र, उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी वंचितने अनपेक्षितपणे माघार घेतली आणि काँग्रेसमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला.
परंतु आजच्या नाट्यमय घडामोडीनी पुन्हा एकदा हा उत्साह ढवळून निघाला आहे. वंचितच्या नगराध्यक्ष पदाच्या माजी उमेदवार डॉ. संगीता अर्चित हिरोळे यांनी अचानक शिंदे सेनेच्या उमेदवार पूजा गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांनी आपल्या सासऱ्यांसह काही समर्थकांसह आमदार संजय गायकवाड यांना भेटून अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिले. यामुळे निवडणुकीत नवे समीकरण निर्माण झाले असून काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या घटनाक्रमामागे आमदार संजय गायकवाड यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा रंगली आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर घाव घालण्याबरोबरच भाजपाला सूचक इशारा देण्याचा प्रयत्नही या हालचालींत दिसून येत असल्याची चर्चा चालू आहे. बुलढाण्यातील स्थानिक राजकारणात गायकवाड यांची प्रतिमा प्रभावी असताना, हिरोळे परिवाराचा पाठिंबा मिळणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरत आहे.
मात्र, हिरोळे परिवाराने हा पाठिंबा पक्षीय भूमिका म्हणून दिलेला आहे की फक्त व्यक्तिगत स्तरावरून, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. पक्षाच्या वरिष्ठांकडून कोणतीही अधिकृत भूमिका घोषित करण्यात आलेली नसल्याने पुढील तासांत या प्रकरणात आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या उलटसुलट परिस्थितीमुळे बुलढाणा नगरपालिका निवडणूक आणखी रोमांचक बनली आहे. तिन्ही प्रमुख उमेदवारांचा प्रचार वेगाने सुरू असून प्रत्येक गट आपली प्रतिष्ठा पणाला लावून या निवडणुकीत उतरला आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक आपल्या बालेकिल्ल्याची कसोटी आहे, तर शिंदे बाजूसाठी ही प्रतिष्ठेची वेळ आहे. भाजपसाठी मात्र ही निवडणूक पुन्हा एकदा जनादेश मिळवण्याची संधी आहे.
एकूणच, बुलढाण्यातील नगरपालिका लढत आता तिरंगी असली तरी पाठीमागील राजकीय गणिते आणि नाट्यमय हालचालीमुळे ही निवडणूक जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा विषय बनली आहे. आगामी काही दिवसांत या लढतीला आणखी वेग येणार हे निश्चित आहे.





