ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांचे कुटुंबीय विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत पोहोचले आहेत.
नव्वदाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांना साधारणतः बारा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांना जगाचा कायमचा निरोप घेतला. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर तब्बल 12 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते. पण, नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं. त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली, धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली. तसेच, देओल कुटुंबीयांनीही, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिलेली. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल, रितेश देशमुख यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली. धर्मेंद्र यांची भेट घेऊन निघालेल्या सर्वच स्टार्सच्या डोळ्यांत अश्रू तराळलेले.





