अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 9 नोव्हेंबर 2025:जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, तालुक्यातील बहुतांश सर्कलमध्ये यंदा महिला आरक्षण लागू झाले आहे. मात्र, कुटासा जिल्हा परिषद सर्कल हे एकमेव सर्वसाधारण आरक्षण असलेले सर्कल ठरल्याने, इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक पक्षातून दहा-दहा इच्छुक पुढे सरसावत असून, या सर्कलवर ‘तिकीट कोणाला मिळणार?’ हा चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.
कुटासा सर्कल ठरले ‘हॉट सीट’
कुटासा जिल्हा परिषद सर्कलमध्ये ओपन आरक्षण निघाल्याने राजकीय तापमान प्रचंड वाढले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (शिंदे गट तसेच ठाकरे गट) पयांच्याकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये या सर्कलमध्ये विविध पक्षांमध्ये चुरशीचा सामना झाल्याने, यंदाही तीव्र स्पर्धा होणार हे निश्चित झाले आहे.
पक्षांमध्ये उमेदवार निवडीवर मंथन
भाजपकडून स्थानिक पातळीवरील काही प्रभावशाली कार्यकर्त्यांनी जिल्हा पातळीवरील संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडूनही द संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. वंचित आघाडी आघाडी मध्ये चार ते पाच संभाव्य उमेदवारांची व इतर पक्षसुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
प्रत्येक पक्षात तिकीटासाठी जोरदार लॉबिंग सुरू असून, कार्यकर्त्यांकडून स्थानिक पातळीवरील गटबाजीही जाणवते. त्यामुळे “तिकीट कोणाला मिळणार?” या एका प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक समीकरणांचा विचार
कुटासा सर्कलमध्ये विविध समाजघटकांचे प्रमाण संतुलित असल्याने, कोणताही उमेदवार सहज विजय मिळवू शकत नाही. मतदारसंख्येचा विचार करता कोळी समाज,कुंभी समाज, तसेच इतर मागासवर्गीय मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात.
याशिवाय तरुण मतदारांचे प्रमाणही वाढले असून, ते आता बदल आणि विकासाच्या नावाने मतदान करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे फक्त जातीय समीकरणावर नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यांवर भर देणारा उमेदवार अधिक लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे.
मतदारांच्या अपेक्षा वाढल्या
गेल्या पाच वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक सुविधा या क्षेत्रांमध्ये समाधानकारक कामगिरी झाली नाही, असा मतदारांचा सूर आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार उमेदवाराचा पक्ष पाहून नव्हे, तर काम पाहून मतदान करतील, अशी शक्यता वर्तवली जाते.
कुटासा परिसरात शेतीप्रधान जनता असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचन सुविधा, तसेच शेतमालाला बाजारभाव या मुद्द्यांवर चर्चा रंगू लागली आहे.
प्रचाराला सुरुवात लवकरच
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होताच उमेदवारांनी प्रचाराचा झेंडा हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियासह गावागावांत जनसंपर्क मोहिमा सुरू करण्याचे नियोजन उमेदवारांकडून होत आहे.
कुटासा सर्कलमधील जिल्हा परिषद निवडणूक ही यंदा अकोट तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ठरणार आहे. कारण एकीकडे इतर सर्व सर्कल महिला आरक्षणात गेल्याने पुरुष इच्छुकांना मैदानात उतरण्याची एकमेव संधी येथे मिळाली आहे, तर दुसरीकडे सर्वच प्रमुख पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष या एका सर्कलकडे लागले असून, तिकीट कोणाला मिळते आणि जनता कोणावर विश्वास दाखवते, हेच पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.





