अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५| संतोष माने प्रतिनिधी मूर्तिजापूर :- सोयाबीन खरेदी हंगामाची प्रक्रिया सुरू होताच अकोल्यातील शेतकऱ्यांची नोंदणीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. शासकीय खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्यापासून प्रत्येक केंद्राबाहेर शेतकऱ्यांची तुफान धावपळ सुरू असून, रांगा लांबत चालल्या आहेत.
अनेक शेतकरी पहाटेपासून केंद्राबाहेर हजेरी लावत असून, तांत्रिक अडचणी आणि सर्व्हर डाऊनमुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी ऑनलाईन प्रणाली मंद गतीने सुरू असल्याने नोंदणी पूर्ण होण्यासाठी तासन्तास लागतात. परिणामी, उन्हातान्हात उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

राज्य सरकारने या वर्षी सोयाबीन खरेदीसाठी केंद्रवार ऑनलाईन नोंदणी अनिवार्य केली आहे. परंतु, अनेक शेतकरी डिजिटल प्रक्रियेशी परिचित नसल्याने त्यांना स्थानिक ई-सेवा केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे. काही केंद्रांवर संगणकांची कमतरता, तर काही ठिकाणी इंटरनेट अडथळे असल्याने नोंदणीचा वेग मंदावला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “नोंदणीसाठी रांगेत उभे राहून दिवस जातो; तरीही क्रमांक लागत नाही,” अशी परिस्थिती आहे. प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन अधिक नोंदणी केंद्रे वाढवावीत आणि सर्व्हरची क्षमता वाढवावी, अशी मागणी होत आहे.
सोयाबीनचे दर सध्या चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे मात्र नोंदणी प्रक्रियेतल्या अडचणींमुळे हा उत्साह ‘कागदी कारभारात’ अडकलेला दिसतोय.





