अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक. २८ ऑक्टोबर २०२५:अमरावती विभागातील शिक्षक मतदार मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित केला असून, या आधारे नव्या मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत.जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र शिक्षकांनी वेळेत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक-१९ मधील अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरता येईल. पात्र शिक्षकांनी आपली माहिती व पुरावे व्यवस्थित सादर करून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी गमावू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी विहित नमुना क्रमांक-१९ मधील अर्ज आवश्यक पुराव्यांसह संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. ही प्रक्रिया देखील ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले की, शिक्षक मतदार संघासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, प्रत्येक पात्र शिक्षकाने यात सहभाग नोंदवावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ६ नोव्हेंबर २०२५
ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ: mahaelection.gov.in





