अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३ ऑक्टोबर २०२५:अमरावती जिल्ह्यात गुन्हेगारी विश्वावर मोठा घाव घालत एटीएस (Anti Terrorist Squad) आणि जिल्हा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत २ ऑक्टोबरच्या रात्री सलग दोन ठिकाणी झालेल्या धडक कारवाईत तब्बल ११ जणांना शस्त्रांसह अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
ब्राह्मण सभा कॉलनीत पहिली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी येथे करण्यात आली. या भागातील एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील ५ संशयित इसमांना शस्त्रांसह पकडण्यात आले. कारवाईदरम्यान संशयितांनी पोलिसांवर फायरिंग केल्याचीही चर्चा असून त्यामुळे या कारवाईचे गांभीर्य अधिक वाढले आहे. कश्यप पेट्रोल पंप परिसरात दुसरी कारवाईयानंतर दुसरी कारवाई कश्यप पेट्रोल पंप परिसरात करण्यात आली. येथे ६ जणांना शस्त्रांसह अटक करण्यात आली. या ठिकाणीही पोलिसांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे दोन्ही कारवाया अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडल्या. पोलिसांनी मात्र सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
एकूण ११ आरोपी ताब्यात

दोन्ही कारवायांत मिळून पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त झाली असून हा प्रकार दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांकडून नाकारण्यात आलेली नाही. सध्या अँटी टेरेरिस्ट स्क्वॉड (ATS) आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
राजकीय कार्यकर्त्याच्या घराचा सहभाग?
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पहिली कारवाई ज्या घरातून झाली ते घर एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. नेमक्या कोणत्या हेतूसाठी या संशयितांना आश्रय देण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे. या घडामोडीमुळे राजकीय संबंध आणि गुन्हेगारी यांचा मेळ उघडकीस येत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
परतवाडा परिसरात भीतीचे वातावरण
दोन्ही कारवायांमध्ये झालेल्या फायरिंगमुळे परतवाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
पुढील तपास सुरू
सध्या पोलिसांनी अटक केलेल्या ११ जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा स्त्रोत, आरोपींचा उद्देश आणि त्यांच्या हालचालींचा तपास एटीएस व ग्रामीण पोलिसांच्या पथकाकडून केला जात आहे. तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमरावती जिल्ह्यातील या कारवाईमुळे गुन्हेगारी आणि राजकीय जगतात खळबळ उडाली आहे. दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी पोलिसांनी दाखवलेली धडक कारवाई ही गुन्हेगारीविरोधातली मोठी कारवाई मानली जात आहे.