अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २८ सप्टेंबर २०२५ गणेश बूटे :- अकोला कडून अकोटकडे जात असलेली चारचाकी गाडी अचानक नियंत्रण सुटल्याने पलट्या खात सरळ नाल्यात जाऊन कोसळली. हा भीषण प्रकार कुटासा फाट्याजवळ घडला. अपघात इतका धक्कादायक होता की क्षणभरात भीषण अनर्थ घडल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी गाडीत प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडी बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वेगावर नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, वेग आणि निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात कसा येऊ शकतो याचा धडा या घटनेतून समोर आला आहे.
