अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : सावनेर तालुक्यातील सावळी येथील विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षिका सोनाली दुपारे यांना निलंबित करण्यात आले आहे. आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थिनींकडून स्वतःच्या घरची भांडी, कपडे धुणे तसेच साफसफाईसारखी घरगुती कामे करून घेतल्याच्या तक्रारींवरून ही कारवाई झाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांनी चौकशीनंतर निलंबनाचे आदेश जारी केले.
तक्रारीवर तत्काळ कारवाई
भाजप जनजाती आघाडीचे शहर अध्यक्ष आकाश मडावी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधीक्षिकेविरुद्ध तक्रार केली होती. या शिष्टमंडळात रोहित कुंभरे, ललित मडावी, अनिकेत कुंबरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तक्रार मिळाल्यानंतर अपर आयुक्त आयुषी सिंह व प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी चौकशी केली आणि निलंबनाचे आदेश दिले.
आश्रमशाळांवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणामुळे आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनींकडून घरगुती कामे करून घेणे हा अमानवीय प्रकार असल्याची टीका होत असून पुढील चौकशीदरम्यान गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.