अकोला न्यूज नेटवर्क
रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गुरुवारी केलेल्या मोठ्या आणि यशस्वी कारवाईत १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडम बालकृष्ण याचाही समावेश आहे. या ऑपरेशनमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त मोहीम
रायपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर परिसरातील जंगलात नक्षलवादी मोठ्या संख्येने जमल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, विशेष कृती दल आणि जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी मोहीम सुरू केली. भीषण चकमकीनंतर १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
नक्षल चळवळीला धक्का
या कारवाईत बंडखोरांकडून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. मनोज उर्फ मोडम बालकृष्णाचा खात्मा हे सुरक्षा दलाचे मोठे यश मानले जात आहे. त्याच्या मृत्यूनंतर गरियाबंद व आसपासच्या भागातील नक्षल चळवळीचे मनोबल खच्चीकरण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.