अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. १२ सप्टेंबर) देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सुरुवात करून उपराष्ट्रपतीपदी पोहोचलेला त्यांचा राजकीय प्रवास विशेष मानला जात आहे.
निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून उभे असलेल्या राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली. विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत एनडीएबाहेरील १४ खासदारांनीही राधाकृष्णन यांना मतदान केले, त्यामुळे विरोधकांची मते फाटल्याचे स्पष्ट झाले.
चार दशकांचा राजकीय व सार्वजनिक प्रवास
१९५७ मध्ये तामिळनाडूतील तिरुपूर येथे जन्मलेले चंद्रपूरम पोन्नुसामी राधाकृष्णन वयाच्या १६व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. १९९८ आणि १९९९ मध्ये त्यांनी कोईम्बतूर येथून लोकसभेत प्रवेश केला. खासदारकीच्या काळात वस्त्रोद्योग स्थायी समितीचे अध्यक्षपद, तसेच इतर अनेक महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर त्यांनी काम केले. २००४ साली ते संयुक्त राष्ट्र महासभेला भारतीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून उपस्थित राहिले. तामिळनाडू भाजप अध्यक्ष, कोची येथील कॉयर बोर्डाचे अध्यक्ष, केरळ भाजप प्रभारी अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
राज्यपाल म्हणून झारखंड, तेलंगणा, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काम केल्यानंतर आता ते देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे घटनात्मक पद भूषवू लागले आहेत. नारळाच्या तागाच्या निर्यातीला सर्वोच्च पातळीवर नेण्यापासून ते राजकीय यात्रांच्या आयोजनापर्यंत राधाकृष्णन यांची कारकीर्द बहुआयामी राहिली आहे.
