WhatsApp

IIT मुंबईचा कार्यक्रम वादात; आक्षेपार्ह पोस्टरमुळे संस्थेची माघार

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : आयआयटी मुंबई एका मोठ्या वादात सापडले आहे. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात होणाऱ्या “दक्षिण आशियाई भांडवलशाही” कार्यशाळेच्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्यंगात्मक चित्रण केल्यामुळे सोशल मीडियावरून संस्थेविरोधात जोरदार टीका होऊ लागली. दबाव वाढल्यानंतर आयआयटी मुंबईने या कार्यशाळेतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की, आता त्यांचा या कार्यक्रमाशी कोणताही संबंध राहिलेला नाही.



वादाच्या केंद्रस्थानी असलेले पोस्टर
या पोस्टरमध्ये “भांडवलदार भारताचे पिरॅमिड” असे शीर्षक देत वेगवेगळ्या स्तरांवर व्यंगचित्र दाखवण्यात आले होते. वरच्या थरात उद्योगपतींना “आम्ही तुमच्यावर राज्य करतो” असे लिहून दाखवले होते. दुसऱ्या थरात मोदी, शहा आणि योगी यांच्याशी साधर्म्य असलेली चित्रे “आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो” या विधानासह होती. तिसऱ्या थरात सुरक्षा दलांना “आम्ही तुमच्यावर गोळीबार करतो” असे दर्शवले गेले. खालच्या दोन थरांमध्ये कामगार व मध्यमवर्गीयांचे चित्रण करून त्यांना “आम्ही सर्वांसाठी काम करतो” आणि “आम्ही सर्वांना खायला घालतो” असे दाखवण्यात आले होते. यामुळेच टीकेची लाट उसळली.

IIT मुंबईचे स्पष्टीकरण व निर्णय
प्रचंड टीकेनंतर आयआयटी मुंबईने अधिकृत एक्स हँडलवर निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, या कार्यशाळेचे आयोजन प्रत्यक्षात बर्कले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स-अ‍ॅमहर्स्ट विद्यापीठ यांच्या भागीदारीत होत आहे. आयआयटी मुंबईचा सहभाग केवळ नाममात्र दाखवला गेला होता. मात्र, झालेल्या गैरसमज आणि आक्षेप लक्षात घेऊन संस्थेने कार्यक्रमाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!