अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पतंजली साम्राज्याचे सहसंस्थापक आचार्य बाळकृष्ण यांनी उत्तराखंडमधील जॉर्ज एव्हरेस्ट पार्क प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत केलेल्या ‘कमाल’मुळे मोठी चर्चा रंगली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या तपासानुसार, बाळकृष्ण यांच्या मालकीच्या कंपन्यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा प्रकल्प आपल्या ताब्यात घेतला. धक्कादायक म्हणजे, या प्रकल्पातून एका वर्षात कंपनीच्या नफ्यात तब्बल ८ पट वाढ झाली आहे.
निविदा प्रक्रियेतील ‘गैरव्यवहार’ची शंका
उत्तराखंड सरकारने मसुरीजवळील जॉर्ज एव्हरेस्ट पार्कच्या विकासासाठी १४२ एकर जमिनीवर कंत्राट काढले. या प्रक्रियेत तीन कंपन्या उतरल्या. तपासात समोर आलं की त्यापैकी दोन कंपन्या – प्रकृती ऑर्गॅनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि भरुआ अॅग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड – या बाळकृष्ण यांच्या जवळपास संपूर्ण मालकीच्या होत्या. तिसरी कंपनी राजस एरोस्पोर्ट्समध्ये त्यांचा अल्पांश हिस्सा असताना, कंत्राट मिळाल्यानंतर काही महिन्यांत त्यांनी त्या कंपनीत बहुमत मालकी मिळवली. यावरून संपूर्ण प्रक्रिया बाळकृष्ण यांच्या दिशेने वळवण्यात आली, अशी शंका उपस्थित होत आहे.
एका वर्षात नफा ८ पट वाढला
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राजस एरोस्पोर्ट्सचा २०२२-२३ मध्ये एकूण नफा १.१७ कोटी होता. मात्र पुढच्याच वर्षी २०२३-२४ मध्ये तो थेट ९.८२ कोटींवर पोहोचला. म्हणजेच केवळ एका वर्षात तब्बल आठ पटींनी वाढ! जरी तोटाही वाढून ५८ लाखांवरून २.३५ कोटी झाला असला, तरी नफ्यातील ही झेप उत्तराखंडमधील प्रकल्पामुळेच झाल्याचे स्पष्ट दिसते. पर्यटन विभागाने सर्व काही न्याय्य पद्धतीने झाले असल्याचा दावा केला असला, तरी या घडामोडींनी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत.