अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो गणेश बूटे आडगाव दिनांक ३० ऑगस्ट २०२५ :- गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव ठरावा, या हेतूने आडगाव बु येथील नवनिर्मित गणेशोत्सव मंडळाने शालेय ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली. या उपक्रमाचे स्थानिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
आडगाव बु येथील नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ यावर्षीदेखील सामाजिक जाणीव जपणारा उपक्रम राबवत आहे. धार्मिक उत्सवाला सामाजिक जबाबदारीची जोड देत मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद महाविद्यालयातील ग्रंथालयाला शालेय उपयोगी पुस्तके भेट देण्यात आली.
या उपक्रमावेळी प्रा. गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पुस्तक वाचनामुळे घडणारे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले. नवनिर्मित गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यावर विशेष भर देण्यात आला.
स्थानिक पोलीस पाटील हितेश हागे यांनी मंडळाच्या या लोकोपयोगी कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, धार्मिक उत्सवांमध्ये समाजासाठी उपयुक्त उपक्रम घडणे ही एक सकारात्मक दिशा आहे.

कार्यक्रमावेळी जी. प. शाळेचे प्राचार्य श्री. चारुदत्त मेहरे, डॉ. संतोष गायकवाड, श्री. सोळंके, श्री. प्रमोद दाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष विशाल देशमुख यांच्यासह हरिश देशमुख, विठ्ठल चतुरकर, सागर कोहरे, अनुप देशमुख, सुनील सोळंके, संतोष डाबेराव, गणेश डाबेराव आदींनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढण्यास मदत होणार आहे, तर समाजातील इतर मंडळांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.