अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी राज्यभरातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. गर्दीमुळे पोलिस आणि प्रशासनाची कसोटी लागली आहे.
सरकारचे कौतुक, पण इशाराही स्पष्ट
उपोषणास परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानताना जरांगे पाटील यांनी सहकार्याबद्दल कौतुक केले. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे जाहीर केले. आंदोलकांना शांततेचे आवाहन करताना त्यांनी जाळपोळ किंवा दगडफेक टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तरीही सोमवारी आणि मंगळवारी जर सरकारने सहकार्य केले नाही तर पुन्हा मुंबई जाम करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
समाजासाठी बलिदान, मागे हटणार नाही
जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात समाजाला उद्देशून सांगितले की, कुठल्याही नेत्याच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकायचे नाही, तर समाजाच्या भल्यासाठी एकत्र राहायचे आहे. सातारा संस्थानाचे गॅझेट लागू करून तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, बलिदान देणाऱ्या कुटुंबांच्या मागण्या मान्य करणे आणि समाजाच्या इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, माझे कुटुंब नष्ट झाले तरी समाजासाठी लढा थांबणार नाही,” असे ते भावनिक शब्दांत म्हणाले.