अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्यातील अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंगचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी पातूर रोडवरील एका बंद पडलेल्या सेंटरजवळ ऑटो रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची अवैध रीफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली आणि आरोपींना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान ३८ सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यात २१ भरलेले तर १७ रिकामे सिलेंडर होते. याशिवाय गॅस भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मशीन व दोन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचाही समावेश होता.
गुन्हेगारीवर पोलिसांचा आळा
या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले. त्यांना अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रत्यक्ष छापामारी मोहिम एपीआय गोपाल ढोले व स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने पार पाडली. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अशा प्रकारचे अवैध धंदे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत.
स्थानिकांचा पोलिसांना पाठिंबा
या धाडसी पावलाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांची माहिती मिळाल्यास त्वरित प्रशासनाला कळवावी, जेणेकरून भविष्यात मोठे अपघात टाळता येतील.
