WhatsApp

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वेंचं निधन; ‘गुंड्याभाऊ’ कायमचे प्रेक्षकांच्या मनात

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई :
मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. आज सकाळी १०.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही माहिती दिली. “चिमणराव” मालिकेतील गुंड्याभाऊ ही भूमिका साकारणाऱ्या कर्वेंची ओळख मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.



गुंड्याभाऊंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचले
१९७९ मध्ये प्रसारित झालेल्या चिं. वि. जोशी यांच्या “चिमणराव” या मालिकेत बाळ कर्वेंनी साकारलेली गुंड्याभाऊंची भूमिका आजही रसिक विसरू शकलेले नाहीत. या भूमिकेमुळेच लोकांनी त्यांना गुंड्याभाऊ या नावानेच संबोधायला सुरुवात केली. कर्वे स्वतःही एका मुलाखतीत म्हणाले होते की, “विलेपार्ल्यात फिरताना लोक आजही मला गुंड्याभाऊ म्हणूनच ओळखतात.”

नाट्यविश्वात समृद्ध वाटचाल
विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या बाळ कर्वेंनी ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, ‘कुसुम मनोहर लेले’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून अभिनय केला. रसिक प्रेक्षकांनी त्यांना प्रत्येक भूमिकेत भरभरून दाद दिली.

‘गुंड्याभाऊ’ची निवड कशी झाली?
खरं तर या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचं नाव विचारात होतं. मात्र काही कारणाने ही भूमिका कर्वेंकडे आली आणि त्यांनी ती इतक्या ताकदीने साकारली की ती आज अजरामर ठरली. हातात विनोदाचा सोटा घेऊन प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं आणि विचार करायला लावण्याचं काम त्यांनी केलं.



Watch Ad

नोकरी आणि ‘किलबिल’चे दिवस
२५ ऑगस्ट १९३० रोजी जन्मलेल्या बाळ कर्वेंचं खरं नाव ‘बाळकृष्ण’ असं होतं. त्यांनी पुण्यातून स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून ३२ वर्षे सेवा बजावली. त्याच काळात त्यांनी सुमंत वरणगांवकर यांच्यासोबत ‘किलबिल बालरंगमंच’ ही संस्था उभारली आणि अनेक बालनाट्ये सादर केली.

अभिनय जगतातील अमिट ठसा
नोकरी, नाट्यसंस्था, नाटकं, मालिका अशा विविध माध्यमांतून काम करताना त्यांनी कधीच अभिनयापासून दूर राहिलं नाही. त्यांची कलाकृती आणि भूमिकांमधील प्रामाणिकता आजही मराठी रंगभूमी व दूरदर्शनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे.

Leave a Comment