WhatsApp

फडणवीसांवर जरांगेंचा थेट इशारा : “राजकीय करिअर बरबाद होईल”

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आझाद मैदानात आंदोलनासाठी सुरुवातीला नकार मिळाल्यानंतर अखेर राज्य सरकारकडून एका दिवसाची परवानगी दिली गेली. मात्र ही परवानगी मान्य करण्यास जरांगे यांनी नकार दर्शवला असून, त्यांनी फडणवीस यांना उघड इशारा दिला आहे.



आझाद मैदानात आंदोलनास सुरुवात
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी आंतरवली सराटीत गणेशपूजन करून आंदोलनाच्या तयारीला प्रारंभ केला. गुरुवारी जुन्नरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती.

सरकारचा निर्णय आणि जरांगेंची नाराजी
मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचा आंदोलनास नकार देण्याचा निर्णय योग्य ठरवला होता. परंतु राज्य सरकारने पुढे जाऊन एका दिवसाची परवानगी दिली. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “एक दिवसाची परवानगी ही मराठा समाजाची थेट चेष्टा आहे. मोठं मन दाखवत मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी दिली पाहिजे होती.”

फडणवीसांवर थेट टीका
जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या वेदना समजून घ्याव्यात. मराठ्यांनी दिलेल्या पाठिंब्यावरच तुमचं सरकार आलं आहे. न्यायालयाकडे बोट दाखवत शेवटी परवानगी त्यांनीच दिली. मग एक दिवसापुरतीच परवानगी का? त्यांनी जाणूनबुजून मराठ्यांशी अन्याय केला.”



Watch Ad

राजकीय करिअरवर इशारा
जरांगे पाटील यावेळी म्हणाले, “मराठ्यांची लाट वारंवार तुमच्या विरोधात आली, तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल. आजही सांगतोय, संधी तुमच्याच हातात आहे. मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. तेव्हाच हा समाज तुम्हाला विसरणार नाही. नाहीतर महाराष्ट्र तुमच्याविरोधात उभा राहील.”

समाजाच्या भावना आणि जरांगेंची विनंती
“मराठा समाजाच्या योगदानाची कदर करायला हवी. आमच्या मागण्यांकडे प्रामाणिकपणे लक्ष द्या. आम्ही गुलाल टाकून मरेपर्यंत आरक्षणाच्या उपकारांची आठवण ठेवू. पण आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका,” अशी भावनिक विनंती जरांगेंनी केली.

Leave a Comment