अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यानंतर आता मराठी सिनेविश्वातून आणखी एक दुःखद बातमी आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांची प्राणज्योत मालवली आहे. अच्युत पोतदार यांनी ठाण्यात अखेरचा श्वास घेतला.
अच्युत पोतदार ‘३ इडियट्स’मधील प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. अच्युत पोतदार यांचे सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५ रोजी) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज १९ ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
अच्युत पोतदार यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह टीव्ही आणि बॉलीवूडमध्येही शोककळा पसरली आहे. चित्रपट, मालिका, जाहिरात, नाटक अशा माध्यमातून अच्युत पोतदार यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. स्टार प्रवाहने अच्युत पोतदार यांच्या निधनाची पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अच्युत पोतदार यांनी झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत आजोबांची भूमिका साकारली होती. मालिकेच्या शेवटी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरातूनच शूटिंग करत होते. अच्युत पोतदार यांनी ‘३ इडियट्स’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘अंगार’, ‘रंगीला’, ‘दहेक’, ‘आक्रोश’, ‘अर्ध सत्य’, ‘फर्ज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या होत्या.
