अकोला न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या हितासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, आता त्यांनी ‘लाडकी सून’ अभियानाची घोषणा केली आहे. रविवारी ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या नव्या अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानाचा उद्देश सासरच्या जाचाला बळी पडलेल्या सुनांना सुरक्षा आणि मदत देणे हा आहे.
काय आहे ‘लाडकी सून’ अभियान?
ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, हे अभियान खास करून ‘लाडक्या सुनांसाठी’ सुरू केले जात आहे. ‘आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी असावी,’ या विचाराने शिवसेनेने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. सासरच्या घरी अप्रिय घटनांना तोंड द्यावे लागणाऱ्या महिलांना या अभियानांतर्गत मदत केली जाईल. शिंदे यांनी यावेळी हेल्पलाईनचे क्रमांकही जाहीर केले. त्यांनी पीडित सुनांना न घाबरता या क्रमांकांवर फोन करण्याचे आवाहन केले. फोन करणाऱ्यांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि त्यांना या अभियानामार्फत आवश्यक ती सुरक्षा दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘ज्या सुना आहेत, त्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि मी त्यांचा भाऊ आहे. कुणीही त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केल्यास त्याची गाठ थेट शिवसेनेशी आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.
‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’चीही सुरुवात
‘लाडकी सून’ अभियानासोबतच एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’चीही घोषणा केली. महिला कुटुंबाची काळजी घेताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत महिलांना नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
अजित पवारांचे स्पष्टीकरण
शिंदे यांनी ‘लाडकी सून’ अभियानाची घोषणा केल्यानंतर, ही एक नवी सरकारी योजना असेल अशी चर्चा सुरू झाली. मात्र, जळगाव येथे पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ‘सध्या अशी कोणतीही योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही,’ असे त्यांनी सांगितले. कोणतीही सरकारी योजना सुरू करायची असल्यास त्याबद्दल कॅबिनेट बैठकीत चर्चा केली जाते आणि त्यानंतरच ती अमलात येते. मात्र, चांगल्या योजनांसाठी सरकार नेहमीच तयार असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
