WhatsApp

खामगावात जलसमाधी आंदोलनादरम्यान खळबळ: आंदोलकाने पूर्णा नदीत उडी घेतली, शोधकार्य सुरू

Share

अकोला न्यूज नेटवर्क
खामगाव :
जळगाव प्रकल्पातील विविध समस्यांवरून आंदोलन करणाऱ्या गावकर्यांनी जलसमाधी आंदोलनाची हाक दिली होती. हे आंदोलन सुरू असतानाच खामगावातील पूर्णा नदीच्या पात्रात एका आंदोलकाने उडी घेतल्याने खळबळ उडाली. प्रशासनाचा निषेध म्हणून घेतलेल्या या उडीनंतर तो आंदोलक पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्याचा शोध सुरू आहे.



जलसमाधी आंदोलनाचा इशारा
खामगावातील जिगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आडोळ खुर्द गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यांनी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे अनेकदा विनंती केली, पण लक्ष दिले गेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये घरांसाठी कमी मोबदला, गावठाण देण्यासाठी प्रशासनाने केलेला विलंब, गावठाणातील कामांचा निकृष्ट दर्जा आणि नवीन गावठाणाचा रस्ता बदलण्याचा प्रशासनाचा प्रयत्न यांचा समावेश आहे. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की एकाच प्रकल्पातील इतर गावांना वेगळा न्याय आणि आडोळ खुर्द गावाला वेगळा न्याय दिला जात आहे, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे.

आंदोलकाची नदीत उडी
शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी आडोळ खुर्द गावातील ग्रामस्थ कुटुंबातील सदस्यांसह पूर्णा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यासाठी जमले. सकाळी १० वाजतापासून लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. प्रकल्प अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू असतानाच अचानक वाद झाला. याच बाचाबाचीत गौलखेड येथील विनोद पवार नामक एका आंदोलकाने प्रशासनाचा निषेध करत थेट नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीत उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र गोंधळ उडाला. कोणतीही पूर्वतयारी नसल्यामुळे तो सर्वांसमोर वाहून गेला.

शोधकार्य आणि तणावपूर्ण परिस्थिती
दुपारी तीन वाजल्यानंतरही विनोद पवार दिसून न आल्याने प्रशासनाने तात्काळ एनडीआरएफच्या विशेष पथकाला बोलावले. सध्या त्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर आंदोलन अधिक आक्रमक झाले असून, संतापलेल्या जमावाने एका प्रकल्प अधिकाऱ्याला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय कुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रचंड टीका होत आहे.

Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!