अकोला न्यूज नेटवर्क
जालना : शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाने उपोषण सुरू केले आहे. कौटुंबिक वादातून पोलिसांनी आरोपींना मदत करत असल्याचा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेले महिनाभर उपोषण करत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यामध्ये आल्या होत्या. त्यावेळी या आंदोलनकर्त्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना अडवले. याचवेळी पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी अमित चौधरी यांच्या कमरेत मागून फिल्मी स्टाईलने लाथ मारली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, कुलकर्णी यांच्यावर तीव्र टीका होत आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांकडून एका चिमुकल्या मुलालाही जबरदस्तीने सोबत नेल्याचे दिसत आहे.
आमदार रोहित पवार यांचा संताप
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, ‘खून, बलात्कार, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पोलीस मारहाण करत असतील, तर ते एकवेळ मान्य करता येईल, परंतु महिनाभर उपोषण करूनही न्याय न मिळालेल्या नागरिकाला डीवायएसपी दर्जाचा अधिकारी लाथ मारत असेल तर हा विकृतीचा कळस आहे.’ त्यांनी या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची आणि संबंधित नागरिकाला न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे पोलिसांच्या वागणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या व्हिडिओला पुरावा मानत पोलिसांच्या क्रूर कार्यपद्धतीवर गंभीर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘व्हिडिओमुळे कारवाई होईल, पण अंधाऱ्या कोठडीत होणाऱ्या मारहाणीचे काय?’ त्यांनी पद्मश्री लक्ष्मण माने, पारधी समाजाचे तरुण, आणि फुलनदेवी यांच्या उदाहरणांचा संदर्भ देत पोलिसांचे गरिबांशी आणि दुर्बळ लोकांशी होणारे अमानवी वर्तन अधोरेखित केले आहे. पोलिसांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेने केवळ जालन्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पोलिसांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.