अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : शुक्रवार रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विक्रोळी येथील पार्कसाईट परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून एका घराला मोठा फटका बसला. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबातील दोघे, सुरेश मिश्रा आणि त्यांची मुलगी शालू मिश्रा, यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य करत जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी बाप-लेकीला मृत घोषित केले. या घटनेत कुटुंबातील इतर चार सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
हवामान विभागाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर ठाणे जिल्ह्यात १६ आणि १७ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस मुंबई, कोकण आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, ज्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. दादरसारख्या सखल भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या पावसाने संपूर्ण मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे.