अकोला न्यूज नेटवर्क
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भाजपवर देशात धार्मिक फूट पाडल्याचा आरोप करत ‘देश धार्मिक होता, तो धर्मांध केला’ अशी जहरी टीका केली. तसेच, २०१४ नंतर देश खड्ड्यात गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप
राऊत म्हणाले की, आज देशात जरी तिरंगा फडकत असला, तरी कायदा-सुव्यवस्था, गरिबी आणि भूक यांसारख्या समस्या आजही कायम आहेत. देशाने ७९ वर्षांत प्रगती केली असली, तरी त्याचे श्रेय फक्त एका सरकारला नाही, तर देशाचे नेतृत्व केलेल्या सर्व नेत्यांना जाते. ‘काही लोकांना वाटते की देशाला २०१४ साली स्वातंत्र्य मिळाले, पण सत्य हे आहे की २०१४ नंतर देश स्वतंत्र झाला नाही, तर खड्ड्यात गेला आहे,’ असे राऊत म्हणाले. त्यांनी देशातील वाढत्या धार्मिक फुटीवर चिंता व्यक्त करत, ही फूट स्वातंत्र्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले.
स्वदेशीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा
संजय राऊत यांनी स्वदेशीच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘स्वातंत्र्याआधी आणि नंतर स्वदेशीचा नारा काँग्रेसने दिला. लोकमान्य टिळक आणि जवाहरलाल नेहरूंनी तो दिला म्हणूनच अंगावर खादी आली,’ असे म्हणत त्यांनी भाजपच्या स्वदेशीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘मोदींनी आधी स्वतः स्वदेशीचा अंगिकार करावा, मग लोकांना स्वदेशीचा नारा द्यावा,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘आता त्यांच्या कारकिर्दीचे अखेरचे दिवस सुरू झाले आहेत. एक दिवस ते नेहरू टोपीसुद्धा घालतील आणि काँग्रेसवादी, गांधीवादी, नेहरूवादी बनतील,’ असे भाष्य राऊतांनी केले.
परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह
पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावरही राऊतांनी जोरदार टीका केली. ‘पाकिस्तानला शिव्या देणं सोपं आहे, पण ट्रम्प अथवा चीनच्या विरोधात बोलण्याची हिम्मत मोदींमध्ये नाही,’ असे ते म्हणाले. ‘ट्रम्प रोज देशाला आणि मोदींना शिव्या घालतात, पण त्यांचे नाव घ्यायला मोदी घाबरतात. पाकिस्तानच्या मागे चीन आहे आणि जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे, हे मोदी कसे विसरतात?’ असा सवाल त्यांनी केला. लाल किल्ल्यावरून खोटे बोलण्याऐवजी मोदींनी ट्रम्प यांना सुनावले पाहिजे आणि चीनला दम दिला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
