WhatsApp

पालकमंत्रीपदावरून महायुतीत वाद, शिंदे गैरहजर तर गोगावले दिल्लीत

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच, स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी रायगडची संधी आदिती तटकरे यांना दिल्याने शिवसेना (शिंदे गट) मध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले दोघेही अनुपस्थित होते. या नाराजीनंतर भरत गोगावले यांनी थेट दिल्ली गाठून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांची भेट घेतल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.



असा आहे वाद
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, तरीही स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला. यावर भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही व्यक्त केल्याचे समजते. शिंदे यांनीही यावर वरिष्ठांकडे आपली नाराजी बोलून दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना मुख्यमंत्र्यांनी तटकरे आणि गोगावले यांच्याऐवजी त्रयस्थ व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवली असती, तर वाद टाळता आला असता, असे शिंदे यांचे मत असल्याचे म्हटले जाते.

गोगावले दिल्लीत दाखल
या सर्व घडामोडींनंतर भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आपली नाराजी व्यक्त केल्याचे मानले जाते. गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “झेंडावंदनाची संधी मिळाली म्हणजे पालकमंत्रीपद मिळाले असे नाही. मी आजही पालकमंत्रीपदावर १०० टक्के ठाम आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल.”

शिंदे-गोगावले बैठकीला अनुपस्थित
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले दोघेही अनुपस्थित होते. शिंदे जम्मूमध्ये असल्यामुळे गैरहजर असल्याचे सांगण्यात आले, तर गोगावले दिल्लीला गेल्यामुळे बैठकीला उपस्थित नव्हते. या गैरहजेरीमुळे महायुतीमधील मतभेद अधिक स्पष्ट झाले आहेत.

Watch Ad

उदय सामंत यांचा गोगावलेंना पाठिंबा
या वादावर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ध्वजारोहणासाठी प्रसिद्ध झालेली यादी ही पालकमंत्रीपदाची नाही. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत.” नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असलेले मंत्री दादा भुसे यांनीही आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत असतात, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!