WhatsApp

निवडणुका घेण्याची हिंमत नाही, मतांची चोरी करता, उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई :
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर नाव न घेता जोरदार टीका केली. त्यांनी शिवसेना ही तलवारीसारखी धारदार आणि तळपती तलवार असल्याचे सांगत तिला हात लावण्याचा प्रयत्न करू नये, असा थेट इशारा दिला. त्यांच्या या आक्रमक विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दे उपस्थित केले. “सध्या मोठमोठे राक्षस उभे राहिले आहेत. विकास झालाच पाहिजे, पण मोकळ्या जागा संपवून टॉवर उभे राहत आहेत. मुलांना खेळण्यासाठी मैदाने शिल्लक नाहीत, सण-उत्सव साजरे करण्यासाठी जागा नाही. आम्ही उत्सव कुठे साजरे करायचे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंडळाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, “प्रेम विकत घेता येत नाही. काही लोक मंडळं पळवण्याचा प्रयत्न करतात, पण कार्यकर्त्यांचे प्रेम विकले जाऊ शकत नाही.”

शिवसेना जिवंत असल्याचा विश्वास
उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “जर कोणाला वाटत असेल की शिवसेनेकडे काय आहे? तर काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहे. शिवसेना जिवंत आहे, तलवारीसारखी धारदार आहे. तळपती तलवार लांबून बघा, पण हात लावायच्या भानगडीत पडू नका.”

मतांच्या चोरीचा आरोप
सध्याच्या सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणाला वाटत असेल की आता सत्ता नाही, महापालिका नाही. कारण हे निवडणुका घेऊ शकत नाहीत. ज्या निवडणुका झाल्या, त्यात मतांची चोरी कशी केली हे काल-परवा समोर आले आहे. लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल कसा लागला, हे राहुल गांधी यांनी उघड केले.” चोरून आणलेली सत्ता तुम्हाला न्याय देऊ शकणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Watch Ad

जनतेसाठी शिवसेना कायम
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना आणि जनतेला धीर दिला. “तुम्ही चिंता करू नका. शिवसेना जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एक क्षणही डगमगणार नाही. शिवसेना तुमच्यासोबत कायम असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!