अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील काही महानगरपालिकांमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्टला मांस आणि मच्छीच्या दुकानांवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरणभात खाऊन युद्धाला जात नव्हते, असे सांगत त्यांनी या निर्णयाचा निषेध केला.
शाकाहारी राज्याचा प्रश्न
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा मर्द मराठ्यांचा महाराष्ट्र आहे. या राज्याला शाकाहारी राज्य घोषित केले आहे का? कुणाच्या दबावाखाली हे सर्व सुरू आहे?” मुंबई, पुणे आणि डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर मिळत नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. १५ ऑगस्टसारख्या शौर्याच्या दिवशी मांस विक्रीवर बंदी घालणे म्हणजे स्वातंत्र्याचाच अपमान आहे, असे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या सैन्याचा दाखला
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या काळातच हा आदेश काढण्यात आला होता, असे म्हटले आहे. त्यावर राऊत म्हणाले, “तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवायचं ठरवलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे काही वरण, भात आणि तूप खाऊन युद्ध करत नव्हते, ते मांसाहारच करत होते.” बाजीराव पेशवेसुद्धा मांसाहार करत होते आणि त्याशिवाय युद्ध लढता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमेवरच्या जवानांनाही मांसाहार करावाच लागतो, कारण वरण, भात, तूप खाऊन युद्ध जिंकता येत नाही, असे सांगत त्यांनी या निर्णयाचा निषेध केला.
कामाख्या देवी मंदिराचा संदर्भ
या सरकारला ‘रेडे कापून सत्तेवर आलेले सरकार’ असे संबोधत संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली. ज्या सरकारने कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून आणि त्यांचे मांस प्रसाद म्हणून खाऊन सत्ता मिळवली, त्याच सरकारला मांसाहारचा तिटकारा कसा वाटतो, असा प्रश्न त्यांनी विचारला. १५ ऑगस्ट हा विजय उत्सव आहे, धार्मिक सण नाही. त्यामुळे सरकारने हे सर्व थोतांड बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.
