अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने नक्षलवादग्रस्त भागांमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल राज्यातील ६१६ पोलिसांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर केले आहे. मंगळवारी (१२ ऑगस्ट) रोजी ही घोषणा करण्यात आली. या पदकामुळे गडचिरोली आणि गोंदियासारख्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवायांना यशस्वीरित्या आळा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान
या विशेष सेवा पदकाने सन्मानित झालेल्यांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, आणि ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांसारख्या प्रमुख अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील पोलिसांचाही समावेश
या खडतर नक्षलवादग्रस्त भागात सेवा बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचीही दखल घेण्यात आली आहे. यामध्ये सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे आणि मयुर भुजबळ यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा गौरव
एकूण ६१६ पोलीस कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या या पदकांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानांचाही समावेश आहे. नक्षलग्रस्त भागातील अत्यंत तणावपूर्ण आणि धोकादायक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या निस्वार्थ सेवेला आणि धाडसाला हा सन्मान मिळाला आहे.
